करोना विषाणूंचा प्रसार वर्तमानपत्रांमुळे देखील होऊ शकतो. या चर्चेमुळे मागील ४० दिवसांपासून वर्तमानपत्रांचे वितरण बंद होते. मात्र, आता इतर व्यवसाय हळूहळू सुरु करण्यात आल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता वर्तमानपत्र वितरणालाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणूंमुळे जगभरातील बाजारपेठ ठप्प झाली असून याचा फटका वर्तमानपत्राला देखील बसला आहे. पेपर हातळल्याने करोनाची लागण होण्याच्या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर वितरण संघटनेकडून वर्तमानपत्र वाटप न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागील ४० दिवसांपासून वर्तमानपत्रांचे वितरण बंद होते. मधल्या काळात आठवडाभर हे वितरण सुरु करण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी घातल्याने ते थांबवण्यात आलं.

वितरणादरम्यान पाळावयाचे नियम

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात शहरात वर्तमानपत्राच्या वितरणाला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार, सकाळी ७ ते १० या काळात घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांचे वितरण करावे. तसेच यासाठी वृत्तपत्र घेणाऱ्याची संमती असावी. सोसायटीने घरोघरी वितरणाला परवानगी दिली नाही तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावे. या दरम्यान, वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्क घालावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे वृत्तपत्र नागरिकापर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यातील मुख्य भुमिका बजावणार्‍या वृत्तपत्र वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown conditional permission for distribution of newspapers in pune except containment zones aau 85 svk
Show comments