जगभरात करोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून भारतातही याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अवघा देशच सध्या लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात लोकांची काम ठप्प झाल्याने रोजीरोटी गेली आहे. ठिकठिकाणी अडकून पडलेल्यांना तर एक वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं आहे. अशा परिस्थितीत उजैन येथील बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्थेनं मार्च महिन्यापासून गरजू व्यक्तींना अन्नदानाचा उपक्रम राबविला आहे. या कार्यामध्ये बहुतांश उच्चशिक्षित नागरिक, आयटी इंजिनिअर्स, डॉक्टर्सचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून दररोज १ ते दीड हजार भुकेल्या व्यक्तींपर्यंत जेवण पुरवल जात आहे. डॉ. युवराज कदम यांनी याबाबत माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त राज्यासह परराज्यातूनही लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला आहेत. परंतू, सध्या लॉकडाऊनमुळं अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. जिल्हाबंदी असल्याने या कामगारांना आपल्या मूळ गावी देखील जाता येत नाहीए. त्यामुळे काम नाही त्यामुळे पैसा नाही आणि त्यामुळे चूलही पेटत नाही, अशी अवस्था झाली आहे. तसेच रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर लोकांना तर कोणाच्या मदतीशिवाय जगणचं अवघड झालंय.

ग्रामीण आणि शहरी भागात बाबा जय गुरुदेव धर्म विकास ही संस्था केवळ गरजू व्यक्तींना अन्नदान करते. शिवाय, या संस्थेनं महानगरपालिकेच्या मदतीने आणि व्हॉट्सअॅपद्वारे आपला हेल्पलाइन क्रमांक शेअर केला असून या मार्फत ते आपली सेवा पुरवत आहेत. पिंपरी-चिंचवड, रावेत, डांगे चौक, देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत या ठिकाणी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आजवर अनेक लोकांना अन्नदान केलं आहे.