क्षयरोगाने पोखरलेले देह, मेंदूच्या मलेरियाने कोमात गेलेले रुग्ण, झाडावरून पडून हातपाय मोडलेले रोगी. जीवघेण्या विषारी सर्पानी घेतलेले चावे, अस्वलांनी फाडलेले चेहरे अशा सर्व प्रकारच्या माडिया गोंड आदिवासींवर उपचार करणारे आमटे कुटुंबीय.. पाडे सोडून लिहण्या-वाचण्यासह जगणं शिकण्यासाठी आलेल्या मुलांनी गजबजलेली आश्रमशाळा.. बिबटय़ा, अस्वल, कोल्हे, साप, मगर, साळिंदर, हरिण, मोर-लांडोरी अशा प्राण्यांचे अनाथालय.. आदिवासी बांधवांनी कलाकुसरीने निर्मिलेल्या वस्तू.. लोक बिरादरी प्रकल्पाच्या चार दशकांच्या विलक्षण जीवनाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन रविवारपासून खुले झाले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये भरविण्यात आलेल्या छायाचित्र आणि बांबू हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या हस्ते झाले. अनिकेत आमटे, समीक्षा आमटे आणि अॅड. असीम सरोदे या वेळी उपस्थित होते. गुरुवापर्यंत (२४ सप्टेंबर) दररोज सकाळी नऊ ते रात्री साडेआठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार असून पुणेकरांना आदिवासी बांधवांनी निर्मिलेल्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
डॉ. बाबा आमटे यांच्याशी थेट परिचय नसला तरी ‘ज्वाला आणि फुले’ या संग्रहातील कवितांमुळे माझा त्यांच्याशी ऋणानुबंध जुळला. त्यांच्या कामाशी मी परिचित होतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते उभे राहिले, याकडे लक्ष वेधून अतुल पेठे म्हणाले, विवेकाची कास धरलेली समृद्धी म्हणजे विकास. आदिवासींना मुख्य धारेमध्ये आणण्याचे काम बाबांनी केले. मात्र, सध्या आदिवासी म्हणजे नक्षलवादी असा भ्रम निर्माण केला जात आहे. १९६५ च्या युद्धाचे ‘सेलिब्रेशन’ करून युद्धखोरीसाठी मने तयार केली जात आहेत. राजकारण, समाजकारण, कलाकारणामध्ये मुस्कटदाबी केली जात आहे. ‘नाही रे’ गटाच्या बाजूने उभे राहताना आपल्याला राजकारण कळले पाहिजे आणि भूमिकादेखील घेता आली पाहिजे. वैचारिक, पुरोगामी आणि समाजसुधारक वारसा समजून घेतला पाहिजे.
असीम सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिकेत आमटे यांनी आभार मानले.