लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून, पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत सभा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्याचा निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी येथे व्यक्त केला. ही निवडणूक मोदी आणि मोदीविरोधक अशीच आहे. मोदी विरोधकांची मते काँग्रेसला मिळतील, असा दावा धंगेकर यांनी केला.

आमदार धंगेकर यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत संपादकीय विभागाबरोबर संवाद साधला. काँग्रेसचे निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. निवडणुकीतील सहाही विधानसभा मतदारसंघांतील गणिते, पुण्याचे प्रश्न यासंदर्भात बोलताना धंगेकर यांनी मोदींची लोकप्रियता घटल्याचा दावा केला.

आणखी वाचा-‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामागे मोठा जनाधार कायम राहिला आहे. शिवसेनेची मोठी ताकद शहरात आहे. त्यामुळे मोदींची सभा झाली तरी, काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होईल. त्यादृष्टीने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे ‘रोड शो’ आणि शरद पवार यांच्या सहा विधानसभा मतदारसंघांत सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही धंगेकर म्हणाले.

सहाही विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य प्राप्त होईल. कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातही मताधिक्य असेल. सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी नागरिकांची कामे करत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी झटत आहे, असे धंगेकर म्हणाले.

आणखी वाचा-एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असला तरी, त्यांच्या मतविभाजनाचा कोणताही फटका काँग्रेसला बसणार नाही. ही निवडणूक मोदी आणि मोदी विरोधक अशीच आहे. मोदी विरोधकांची मते काँग्रेसला मिळतील, असे धंगेकर यांनी सांगितले. काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. भाजपमध्ये हुकूमशाही आहे. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. काही पदाधिकारी, नेते बोलत आहेत. मात्र त्यांची नाराजी निश्चितच दूर होईल, असेही धंगेकर म्हणाले.

प्रचाराचा स्तर घसरला

पुण्याची राजकीय प्रगल्भ संस्कृती यापूर्वी कायमच दिसून आली होती. मात्र अलीकडे प्रचाराचा स्तर घसरला आहे. त्यातूनच माझ्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून भाजपने मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही प्रचाराचा स्तर घसरला होता. मात्र मी खालची पातळी गाठणार नाही. चुकीच्या पद्धतीने प्रतिस्पर्ध्यांवर चिखलफेक करणार नाही, असे त्यांनी सांगितले.