लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : देशात एक देश एक निवडणुकीची तयारी सुरू असताना सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक कोणासाठी घेतली जात आहे. कोणाला प्रचारासाठी वेळ मिळावा आणि कोणत्या पक्षासाठी एवढा वेळ दिला गेला आहे, असे सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे शनिवारी झाले. त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, आमदार बच्चू कडू, महेश लांडगे, संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे या वेळी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, की महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी २०१९ मध्ये चार टप्प्यांत घेतलेली निवडणूक आता पाच टप्प्यांत कशासाठी, कोणाला प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून घेतली जात आहे, हे जनतेला सांगितले पाहिजे. परदेशातील स्वीस बँकेतील काळा पैसा २०१४ मध्ये आणण्यापासून केलेली सुरुवात २०२४ मध्ये स्टेट बँकेतील निवडणूक रोख्यांपर्यंत आली असल्याची टीका करून डॉ. कोल्हे म्हणाले, की पाच वर्षांसाठी जनतेकडून मत घेतले जाते. पण जनतेने ज्या विचारधारेला, भूमिकेला मतदान केले आहे, याचा विचार केला जात नाही. विचारधारा बदलली जाते. त्यासाठी विकासाचे कारण दिले जाते. पक्ष बळकाविले जात आहेत.
आणखी वाचा- वसंत मोरे यांनी डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा : आमदार रविंद्र धंगेकर
मोठे नेते सांगतात, की माझा राजकारण पिंड नाही. पण, दूध, कांद्याला भाव नाही हे माझे साधे प्रश्न आहेत. याचे उत्तर दिले पाहिजे असे म्हणत डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. खिशात पैसे, राजकीय पार्श्वभूमी, ठेकेदारी नसताना लोकप्रतिनिधी होता येते. हे केवळ जनतेच्या आशीर्वादाने शक्य झाले, असे डॉ. कोल्हे म्हणाले.
महाराष्ट्राचे भविष्य पत्रकारितेवर अवलंबून आहे. चौथ्या स्तंभाला मागील दहा वर्षांत देशाच्या प्रमुखांना प्रश्नच विचारता येत नाही. कांदाउत्पादक अडचणीत आहे. निर्यातबंदी लादली आहे. कांद्याचा भाव १३ रुपये किलो आहे. माध्यमांनी शेतकऱ्यांचा आवाज बनले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू म्हणाले, की सध्या विचित्र अवस्था आहे. या विचित्र अवस्थेत चित्र निर्माण करण्याची ताकत पत्रकारितेत आहे. अशा व्यवस्थेत पत्रकार चुकीच्या कामावर प्रहार करत आहेत. शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची बातमी येते. पण ती कशामुळे झाली ही बातमी येत नाही. राजकारणात कोणत्या वेळेस कोणती पावले टाकावीत याचा माझा अभ्यास आहे. त्यामुळे कोणताही झेंडा, चिन्ह नसताना चार वेळा निवडून येत आहे, हे सोपे नाही.
आणखी वाचा- बारामती, शिरूरसाठी अजितदादांची ‘फिल्डिंग’
पत्रकार घटनेतील सत्य शोधतो
पत्रकारांच्या जीवनात सतत लढाई असते. स्वातंत्र्यापासून अनेक चळवळी आणि आंदोलने केली आहेत. माझे आणि पत्रकारांचे नाते अत्यंत जवळचे आहे. पत्रकार हा घटनेतीतील सत्य शोधत असतो. त्यामुळे तो सत्यशोधक असतो, असे बाबा आढाव म्हणाले.