देशातील युवकांच्या बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलतेवर भारत महासत्ता होईल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.
एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन बिर्ला यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, खासदार श्रीनिवास पाटील, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव पाटील, डॉ. प्रकाश जोशी, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य ; दोन तृतीयपंथीय अटकेत; विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा
बिर्ला म्हणाले, की, जगात जे काही मोठे परिवर्तन झाले, ते तरुणांमुळे झाले. भविष्यातील पिढ्या परिश्रम, बौद्धिक क्षमतांद्वारे देशाच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. नेतृत्त्व म्हणजे राजकारण नाही. प्रत्येक क्षेत्रात नेत्तृत्त्व आवश्यक असते. सामाजिक, आर्थिक, व्यक्तिगत, आध्यात्मिक आयुष्यात नेतृत्त्वाची क्षमता असायला हवी. नेतृत्त्वगुण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. चांगले नेतृत्त्व असल्यास प्रशासनही चांगले चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला सक्षम नेतृत्त्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकसित राष्ट्र होईल.
आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर लोकशाही मिळालेली नाही. त्यापूर्वीपासूनच आपल्याकडे लोकशाही होती. गावागावांमध्ये सामूहिक निर्णय घेतले जात होते. आपला देश मदर ऑफ डेमोक्रसी आहे. हे जगापुढे मांडले पाहिजे, असेही ते म्हणाले. योग पद्धतीकडे संपूर्ण जग वळले आहे. हेच विज्ञान, तंत्रज्ञान, नवसंशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात घडण्याची आवश्यकता आहे. जगात भारत आघाडीवर असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.