मुकुंद संगोराम
पुणे महानगरपालिकेतील सगळेच नगरसेवक सध्या फार म्हणजे फारच चिडलेले आहेत. एकतर त्यांना फारशी कामे करता येत नाहीयेत आणि दुसरे म्हणजे त्यांच्या प्रसिद्धी व्यवसायाला पालिकेच्या प्रशासनाने खो घातल्यामुळे त्यांची मोठीच कुचंबणा होऊन बसली आहे. कोणत्याही नगरसेवकाला त्यांच्या प्रभागातील ड्रेनेजच्या वाहिन्यांबद्दल प्रश्न विचारून पाहा एकदा. त्यांचा चेहरा हमखास प्रश्नचिन्हांकित होईल. हे काय करायचे काम आहे का, असा साधारण भाव असेल त्यांच्या चेहऱ्यावर. मग तुम्ही त्यांना कचऱ्याबद्दल विचारा. तेव्हाही त्यांची मुद्रा तशीच असेल. पण तुम्ही त्यांना रस्त्यांच्या सिमेंटीकरणाबद्दल बोला, दिवाबत्तीबद्दल बोला. बघा त्यांचा चेहरा कसा फुलून येतो ते. किती भरभरून बोलतील ते या विषयावर. पुढच्या अनेक वर्षांच्या त्यांच्या मनात असलेल्या योजनांबद्दल ते अगदी पोटतिडकीने बोलतील.
महापालिकेच्या कामांसाठी जो कर जमा केला जातो, त्यातील अधिकाधिक रक्कम आपल्या प्रभागात कशी खर्च करता येईल, एवढाच ध्यास सगळे नगरसेवक घेत असतात. त्यात चूक ते काय! पण हा ध्यास आपला प्रभाग सोयींनी अधिक संपन्न कसा होईल यासाठी असला तर. तसे होताना दिसत नाही कारण अनेक प्रभागातील अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे तसेच भिजत पडले आहेत. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी नागरिकांना पालिकेच्या पैशातून, म्हणजे तुमच्या आमच्या करातून भेटवस्तू देण्याचा जो सपाटा गेली काही वर्षे सुरू आहे, त्याला तोड नाही. कधी नव्हे ते पालिकेच्या प्रशासनाने आपला मोडलेला कणा ताठ करून नगरसेवकांच्या या उधळपट्टीला चाप लावायचं ठरवलं. याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदनच करायला हवं.
तुमच्या सोसायटीत तुमच्या घरातला कचरा उचलण्यासाठी येणारे प्लास्टिकचे मोठे डबे कधी निरखून पाहिलेत का तुम्ही. तुमच्या लक्षात येईल, की त्यावर तुमच्या नगरसेवकाचे नाव ठळकपणे लिहिलेलं असेल. तुमच्या मनात त्या नगरसेवकाबद्दलचा आदर त्यामुळे नक्कीच वाढेल. कोण हा महापुरुष की जो आपले नाव लिहून अशी अत्यंत उपयोगी वस्तू आपल्याला भेट देत आहे, असेही तुम्हाला वाटेल. तुमच्या मनात अशीही शंका येईल, की पदरमोड करून आमच्या प्रश्नांची कदर करणारे हे नगरसेवक म्हणजे देवाचेच अवतार तर नाहीत? हल्ली कोण कोणाला उगीच भेट देईल, त्यामागे काही स्वार्थी हेतू नक्कीच असेल, असंही तुम्हाला वाटून जाईल. पण लक्षात घ्या. हे सारे तुमच्या आमच्या करातूनच मिळते आहे. त्यात नगरसेवकाचा वाटा कणभरही नाही. पण चित्र असे निर्माण केलं जातंय, की केवळ नागरिकांच्या हितासाठी नगरसेवक अहोरात्र कसे झटत आहेत पाहा! प्लास्टिकबर बंदी आल्याबरोबर सगळ्या नगरसेवकांनी आपल्या प्रिय मतदारांसाठी मंडई करता येईल, एवढी मोठी ज्यूटची पिशवी भेट द्यायला सुरुवात केली. सामान्य नागरिकांची केवढी ही काळजी. या पिशवीवर तुम्हाला प्लास्टिक टाळा वगैरे संदेशही मिळतील. परंतु त्यापेक्षा मोठय़ा अक्षरात आणि आपापल्या पक्षाच्या झेंडय़ाच्या रंगात नगरसेवकाचे भले मोठे नावही दिसेल. मंडईत किंवा खरेदीला जाताना आपल्या नगरसेवकाची अशी जाहिरात आपल्याच पैशाने करताना, तुम्हाला काय वाटेल, याचा विचार करा.
त्यांच्यासाठी सारे विश्व हेच आपलं घर. त्यामुळे त्यांनी कधी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालिकेच्या पैशातून तुम्हाला असे प्लास्टिकचे डबे दिलेच असतील, तर ते पुण्याबरोबरच देशभरातील अनेक शहरांतही दिले आहेत. अंदमानचे नागरिकही त्यांना पुण्याच्या नगरसेवकांनी दिलेल्या या अनोख्या भेटीने हरखून गेले. केवढे हे औदार्य. पालिकेच्या प्रशासनाने पालिकेच्या, म्हणजे आपल्या पैशावर मारला जाणारा हा डल्ला थांबवण्याचे ठरवल्याबरोबर, सगळे नगरसेवक पक्ष विसरून एकत्र आले. आपले अधिकारच काढून घेतल्याची भावना त्यांच्यात पसरली. पालिका प्रशासन हे आपले बटीक आहे, असे आजवर त्यांना वाटत होते. त्यालाच सुरुंग लागल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे. आपण पालिकेच्या प्रशासनाचे अभिनंदन करतानाच आपला कणा वाकू देऊ नका. हिंमत असेल, तर हपापाचा माल गपापा करण्यापेक्षा स्वत:च्या पैशातून असले डबेडुबे वाटा म्हणावं, हवंतर. बघूच या नगरसेवकांची हिंमत तरी किती आहे ते!