मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com
सिंहगड रस्त्यावर मेट्रो येणार, अशी घोषणा झाल्यानंतरही त्या रस्त्यावर वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाची उभारणी सुरूच राहिली आहे. आता मेट्रो येईल, तेव्हा हा पूल पाडावा लागेल. मग मेट्रो आणि वाहने यांच्यासाठी पुन्हा एकदा पूल बांधावा लागेल. पुणे शहरातील अनेक उड्डाणपूल गेल्या काही काळात पाडावे लागले, कारण ते बांधताना दाखवलेली अदूरदृष्टी. इतका सावळा गोंधळ फक्त पुणे महापालिकेतील अभियंतेच करू शकतात. ‘बांधा, पाडा, बांधा’ हा त्यांचा आवडता खेळ झालेला आहे. विद्यापीठ रस्त्यावरील पूल नुकताच पाडण्यात आला. हडपसरकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला तिहेरी पूल सध्या तांत्रिक अडचणीत आहे. तर हिंजवडी पुलाचे नियोजनच चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
शहराच्या वाढीचा कोणताच अंदाज नसणारे नियोजनकार पालिकेत बसलेले आहेत, याचा हा पुरावा.
रस्ते रुंद करता येत नाहीत, म्हणून उड्डाणपूल बांधायचे. ते चुकले म्हणून रडत बसायचे, हा खेळ पुणेकरांच्या सवयीचा झाला आहे. सातारा रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे म्हणता म्हणता, तो पूल कात्रज डेअरीपर्यंत न नेल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होतेच आहे. हडपसर पुलाचे नियोजन करणाऱ्यांना तर जागतिक दर्जाचे पारितोषिकच द्यायला हवे. कोणत्याही उड्डाणपुलावर वाहतूक नियंत्रक दिवे नसतात, पण या पुलावर आहेत. वाहने चढावर थांबून राहतात आणि नंतर तो चढ चढण्यासाठी वाहनांनाही मोठे कष्ट घ्यावे लागतात. या पुलाला दहा वर्षेही झालेली नाहीत, तर त्यासाठी वापरण्यात आलेले बेअिरग्ज इतक्या कमी काळात निरुपयोगी झाली आहेत. त्याचे कारण ती निकृष्ट दर्जाची आहेत. हे असे घडते, तरीही कुणाला त्याबद्दल जराही लाज वाटत नाही.
पालिकेतील अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा दबाव असतो, हे खरे. परंतु त्याचा दुष्परिणाम प्रत्येक नागरिकाला भोगावा लागतो. या पुलांच्या उद्घाटन प्रसंगी लावण्यात आलेले फलक लगेचच गळून पडतात, त्यामुळे हे पाप कुणाचे, हेही लक्षात राहत नाही. कोणताही सार्वजनिक प्रकल्प उभा करताना आवश्यक असणारी दूरदृष्टी नेहमीच कशी नसते, याचे आश्चर्य वाटूनही आपण सगळे त्याच त्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा निवडून देतो. ते काय करतात, याबद्दल आपल्याला काहीही देणेघेणे नसते. आपले जगणे त्यांच्या हाती असते, याचे भान संपल्यामुळे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आणि नंतर दिवाणखान्यात बसून त्याबद्दल उच्चरवात चर्चा मात्र करत बसतो. नवे काही चांगले घडावे, तर त्याला खोडा घालण्यात हेच राजकारणी आणि अधिकारी सर्वात पुढे. मेट्रोने नारायण पेठेतून जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर नजीकच्या मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची योजना मांडली. हा पूल स्वखर्चाने बांधण्याचीही तयारी दाखवली. परंतु त्याला पालिकेने खोडा घालायचे ठरवले. दुर्गंधीयुक्त नाल्याचे स्वरूप असलेल्या मुठा नामक नदीच्या सुधारणेचा आणि सौंदर्यीकरणाचा जो प्रकल्प आकाराला येत आहे, त्याला या पुलामुळे बाधा येईल, असे पालिकेला वाटते. या अतिशहाणपणास काय म्हणावे? रस्ते आणि पूल पादचारी आणि वाहनांसाठी असायला हवेत. रुंद रस्ते आणि त्यावर अतिरुंद पदपथ हे सूत्र अवलंबत शहरातील सगळे रस्ते नव्याने सुंदर करण्यासाठी कोटय़वधींचा निधी खर्च होत आहे. परंतु त्यातील व्यवहार्यता तपासण्याची गरज कुणाला वाटत नाही. सिंहगड रस्त्याच्या एका बाजूचे पदपथ नव्याने करण्यात आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दुसऱ्या बाजूचे पदपथ अधिक रुंद करण्याची मोहीम सुरू झाली आहे. प्रचंड वाहतूक असणारा हा रस्ता आता अधिक अरुंद झाला आहे. त्यातच कुणा राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि पालिकेच्या अतिक्रमण खात्याच्या निष्क्रियतेमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर पथारीवाल्यांनी आपला संसार थाटायला सुरुवात केली आहे. त्याला कोणी पायबंद घालण्याची शक्यता नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि सुज्ञांनी पालिकेच्या वाटेला जाऊ नये, हेच खरे.