मुकुंद संगोराम
mukund.sangoram@expressindia.com
सांप्रत काळी पुणे या जागतिक कीर्तीच्या शहरातील रस्त्यांच्या प्रत्येक वळणावर एकतर टेंगूळ तरी आले आहे किंवा तेथे खड्डे तरी निर्माण झाले आहेत. एरवीच सतत भरधाव वेगाने धावणाऱ्या पुण्यातील वाहनचालकांना या टेंगळांनी आणि खड्डय़ांनी अक्षरश: पछाडले आहे. परंतु याबाबत कोणाकडे तक्रार करावयासे गेले, की ‘एवढेसे ते खड्डे, त्याचं काय घेऊन बसलात. हळूहळू होतील मोठे, मग करू दुरुस्ती.’ असे अतिशय गोड भाषेत सांगितले जाते. ते ऐकल्यावर सर्वाचाच ऊर भरून येतो.
खड्डा मोठा होण्याची वाट पाहण्याची ही नामी युक्ती किती दूरदृष्टीची आहे, या विषयावर घरातले दिवाणखाने, पालिकेच्या खर्चाने (म्हणजे आपल्याच करांमुळे मिळालेल्या पैशाने) बसवलेले बाक, चौकाचौकांतील पानाच्या टपऱ्या येथे रवंथ चर्चा सुरू राहते. टेंगुळांचे तर विचारू नका. ती फार मोठी नसतात, त्यामुळे दिसत नाहीत आणि त्यावर कोणतेच पट्टेही मारलेले नसल्यामुळे त्यांना चुकवण्याचे काही कारणही उरत नाही. त्यामुळे होते काय की, वाहनचालकांना रस्त्याने भरधाव जाताना वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे लक्ष द्यायला फुरसतच मिळत नाही. नाहीतरी हे दिवे केवळ पोलिसांच्याच सोयीसाठी असतात, असा एक सार्वत्रिक समज परसविण्यात आला आहे. तो खराही आहे. कारण प्रत्येक चौकात कॅमेरा नसल्याने ते दिवे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी असले, तरी चालकांना त्याच्याशी काहीच देणेघेणे राहात नाही. तुम्ही संभाजी पुलावरून फर्गसन महाविद्यालयाकडे जाताना खंडुजीबाबा चौकातील दिवा हिरवा झाला, की जिवाच्या आकांताने गरवारे पुलाकडे झेप घेता. तेव्हा लगेचच येणारे रस्त्यावरील टेंगुळ तुमच्या लक्षात येत नाही. मग तुमचा तोल जातो. तुम्ही पडता. कपाळमोक्ष होऊन, रस्त्यावरील टेंगळाचा भाऊ तुमच्या कपाळावर येऊन बसतो. पण हे टेंगुळ बुजवा, असे सांगायला गेलात, तर तुमच्यासारखे अनेकजण पडून पडून ते टेंगुळ आपोआप नाहीसे होईल, असे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त.
अशी अनेक उदाहरणे देण्याचा मोह आवरायला हवा. कारण प्रत्येक चौकातील वळणावर एकतर खड्डा किंवा टेंगुळ असल्याने ही यादी वाढण्याची शक्यता अधिक. पालिकेच्या निवडणुका होतील की काय, अशी भीती आजी आणि भावी नगरसेवकांना असल्याने ते अधिकाधिक मोठाली कामे पूर्ण करण्याच्या मागे आहेत. न जाणो पुन्हा निवडून आलो नाही तर.. अशा प्रश्नाने हे सारे भयग्रस्त झाले आहेत. त्यांना या टेंगळातून असे काय मिळणार? प्रश्न आहे तो सामान्यांचा. त्यांना या टेंगळांनी आणि खड्डय़ांनी वैताग आणलाय. आधीच जागोजागी तयार केलेले गतिरोधक वाहने खिळखिळे करत आहेत.
या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे सौजन्य या पालिकेकडे नाही. नगरसेवकांना इतक्या छोटय़ा कामांत रस नाही. मधल्यामधे मरतायत ते तुम्ही आम्ही! एकीकडे मोठय़ा रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्याच्या नादात ते रस्ते अरूंद होऊ लागलेत. त्यातच नगरसेवकांच्या आणि अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अरूंद झालेल्या या रस्त्यांवर पथारीवाल्यांनी भाऊगर्दी सुरू केली आहे. त्याबद्दल कुणाला ना खंत ना खेद.
या शहरातील रस्ते कधीकाळी कुणा अभिनेत्रीच्या गालासारखे गुळगुळीत करण्याची घोषणा एव्हाना सगळेजण विसरलेत. त्यांना साधे रस्ते हवेत. पण जागोजागी असलेल्या या टेंगळांकडे आणि खड्डय़ांकडे पालिकेतील रस्ता विभाग का दुर्लक्ष करतो आहे, हा प्रश्न भळभळत्या जखमेसारखा घराघरातून विचारला जातोय. हा रस्ता विभागही मोठय़ा कामांमध्येच रस असणारा आहे, अशी आमची माहिती आहे. ही मोठी कामे खुर्चीतून न उठता आपोआप होतात आणि त्यासाठी प्रत्यक्ष पाहणीचीही गरज उरत नाही. एवढी कार्यक्षमता असणारे दुसरे कोणतेही खाते या महापालिकेत नाही, याबद्दल आमच्या मनांत तिळमात्र शंका नाही. आमची मागणी एवढीच की या टेंगळांना आणि खड्डय़ांना कधीतरी मोक्ष मिळावा, म्हणजे आम्हांस भरधाव वेगाने प्रवास करणे सुकर होईल!