मुकुंद संगोराम
mukund.sangoram @expressindia.com
पीएमपी या पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. एरवी बससेवा अकार्यक्षम असते, बस अस्वच्छ असते, यांसारख्या पुणेरी तक्रारींबद्दल आम्ही या व्यवस्थेला नेहमीच धारेवर धरतो. आमच्या दृष्टीने ही धार तलवारीच्या पात्याची असली, तरी पीएमपीसाठी ती धार पाण्याची असते. त्यामुळे आमच्या तक्रारींचा तेथे काहीच परिणाम होत नाही. पण आम्ही आज करीत असलेला निषेध त्यासाठी नाही. पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी एका निरपराध बसचालकास थेट कामावरून निलंबित करण्याचीच कारवाई केली. हे असे करणे केवळ अन्याय्य असून त्या गरीब बिचाऱ्या बसचालकाच्या बाजूने कोणीतरी उभे राहायला हवे, म्हणून आम्ही ही लेखणी हाती धरली आहे.
तर मुद्दा असा, की या चालकाने डेक्कन जिमखान्यावरील एका पुलावर बस नेली. हा त्याचा अक्षम्य गुन्हा आहे, असे पोलिसांनाही वाटते आणि अधिकाऱ्यांनाही. त्यांच्यापैकी एकानेही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नसणार, अशी आम्हांस खात्री आहे. (कारण नेहमीचेच.. अकार्यक्षमतेचे!) हा पूल ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ यांच्या नावाने ओळखला जातो व तो फक्त दुचाकीस्वारांसाठीच आहे, असे पुणे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो, तेव्हा या पुलावरून दुचाकीस्वारांशिवाय कोणतेही वाहन चालवू नये, अशा सूचनेची पाटी पुलाच्या अगदी तोंडाशी अतिशय बारीक अक्षरांत लिहिलेली आढळून आली. गेल्या आठवडय़ात आमच्या एका परगावहून आलेल्या मित्रानेही या पुलावरून आपली मोटार दामटली. त्याला आपण काय चूक केली हे कळले नाही, तरीही त्याने दंड भरून टाकला. पीएमपीच्या बसचालकाला तर थेट निलंबनाचीच नोटिस. केवढा हा घोर अन्याय. कोणत्याही सामान्य माणसाच्या डोळय़ांना लांबून आणि सहज दिसेल, अशा पाटय़ा लावण्याची पद्धत पुण्यामध्ये नाही, हे का पोलिसांना ठाऊक नाही? (ठाऊक आहे, म्हणूनच तर ते पलीकडच्या बाजूस उभे राहून गुन्हा घडण्याची वाट पाहत असतात.) पुण्यातील नगरसेवकांच्या घराकडे जाणारे दिशादर्शक फलक कसे मोठ्ठय़ा अक्षरात असतात, त्याच अक्षरात अन्य कोणतेही वाहतूक निदर्शक फलक सापडल्यास त्यास पालिकेकडून शंभर रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, असे आमच्या कानावर आले आहे. (आम्हाला खूप पैसे मिळणार, अशी खात्री आहे!) ‘येथे वाहने लावू नयेत’, ‘डावीकडे वळू नये’, यांसारखे फलक लावण्याची गरज पालिकेला बहुधा वाटत नाही. त्यामुळे वाहनचालक सर्रास नियमभंग करतात आणि पोलिसांना आयते सावज सापडते. डेक्कन जिमखान्यावरील आपटे रस्त्यावरून शेवटाला गेलात, तर उजवीकडे वळू नये, असा फलक शोधणाऱ्यास ‘उत्तम नेत्र’ पारितोषिकाचा सन्मान मिळू शकेल. कारण तो फलक रस्त्यावरून दिसण्यासाठी अतिरेकी जाड िभगाचाच चष्मा आवश्यक. अनेक चौकांमध्ये वळू नये हे सांगण्यासाठी फलक लावण्याऐवजी वाहतूक नियंत्रक दिव्यांमध्येच फुलीचे चिन्ह वापरण्याची अजब तऱ्हा या शहरात आहे. कायदा व नियमाबद्दलचे अज्ञान या शहरात मान्य नाही. प्रत्येक पुणेकरास कोणते रस्ते एकेरी आहेत, कोठे वळू नये, कोठे वाहने लावू नयेत, याचे ज्ञान जन्माला येता येताच होते. जगातल्या कोणत्याही शहरात वाहन चालवण्याचा परवाना मिळवायचा, तर त्यापूर्वी पुणे शहरात विना अपघात वाहन चालवून दाखवणे आवश्यक केले पाहिजे, असे आमचे मत आहे. तेव्हा आम्ही त्या पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, की त्या वाहनचालकावरील कारवाई मागे घेऊन, ती महापालिकेवर करण्याची हिंमत दाखवावी. आमचा एक मित्र गरवारे महाविद्यालयात जाणार होता. त्याला संभाजी पुलाकडून कर्वे रस्त्यावर जायचे होते. बापडा. रस्त्यावर कुठेही कर्वे रस्ता कोणता आणि फग्र्युसन रस्ता कोणता, हे त्याला समजू शकले नाही. तो थेट फग्र्युसन महाविद्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला आपली चूक लक्षात आली. हे असे फलकपुराण अशिक्षितांसमोर वाचून काही उपयोग नाही, याची जाणीव आम्हास आहे, परंतु त्या अबोध, निरपराधी चालकाची आम्हास कणव आली, म्हणून हा लेखन प्रपंच.
(तो वाचून पुणे महापालिकेला जाग येईल, अशी आम्हास बिलकुल आशा नाही.)