पावसाने ओढ दिली आहे. पुढील दोन महिन्यांत तो पडेल आणि पुण्याला पुरेसे पाणी मिळेल, या आशेवर या शहरातले राजकारणी विसंबून असतील, तर त्यांना हे स्पष्टपणे सांगायला हवे, की असल्या वेडगळपणामुळे आजवर अनेकदा पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. पुण्याला पिण्याचे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचे असेल, तर आत्ताच तातडीने निर्णय घेऊन एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घ्यायला हवा. नागरिकांना काय वाटेल, त्यांचे किती हाल होतील, ते आपल्याला किती त्रास देतील, असल्या मूर्ख शंका मनात ठेवून अगदी शेवटपर्यंत हा अतिशय महत्त्वाचा आणि तोंडचे पाणी पळवणारा निर्णय घेण्यात कायम टाळटाळ करण्यात येते. सध्या उपलब्ध असलेले पाणी पन्नास टक्के असेल, तर ते पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. आजवर पुणे महापालिकेच्या कारभाऱ्यांनी पाण्याच्या विषयाकडे कधीच गांभीर्याने पाहिलेले नाही. पुरेसे पाणी मिळते, याचा अर्थ ते वाटेल, तसे वापरायचे असा होत नाही.
शहराच्या सर्व भागात आजही समान पाणीवाटपाचे सूत्र लागू नाही. काही भागात चोवीस तास तर काही भागात काहीच तास पाणीपुरवठा होतो, हे चित्र बदलण्यासाठी दीर्घकालीन योजना आखून ती अतिशय काटेकोरपणे राबवायला लागते. तसे कधीच घडत नाही. त्यामुळे पुणेकर पाण्याची नासाडी करतात, असा आरोप उगीचच केला जातो. गेल्या पन्नास वर्षांत या शहराची झालेली वाढ कोणीही अपेक्षित केली नव्हती. शहर वाढत असताना, पाणीपुरवठा, रस्ते, मैलापाण्याचा निचरा यांसारख्या अत्यावश्यक सेवांचा विस्तार लगोलग होणे आवश्यक असते. पुण्यात आधी घरे बांधली जातात, मग पाण्याचे नळ येतात आणि रस्त्यांचा तर अनेक वर्षे पत्ताच नसतो. अरण्येश्वर, सहकारनगर, बिबवेवाडी, कोथरूड, विमाननगर, कोंढवा, मुंढवा यांसारख्या सगळ्या उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना या सुविधा मिळण्यास प्रचंड विलंब लागला. अतिशय भयानक अवस्थेत राहणाऱ्या नागरिकांना आता कुठे बरे दिवस आले, कारण तेथील जमिनींचे भाव वधारले. सध्या हीच अवस्था नव्याने शहरात आलेल्या उपनगरांची आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची हमी नाही. रस्ते नाहीत. मैलापाण्याचा निचरा करणारी योजना नाही. हे सारे घडते, कारण पालिकेची सूत्रे हाती असणाऱ्या कुणालाही नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात काडीचाही रस नाही.
पाणीकपात न करणे म्हणजेच कार्यक्षम कारभार, असे वाटणाऱ्या कारभाऱ्यांना जनहिताचा आणि दीर्घ काळ परिणाम करणारा कोणताच निर्णय कधी घेता आला नाही. पाऊस पडेल, असे स्वप्न पाहत आणखी दोन महिने लोटल्यानंतर पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर झालेली असण्याची शक्यता वेळीच गृहीत धरायला हवी. जनलज्जेखातर पाणीपुरवठा चालू ठेवण्याने पुढील वर्षी किती भयानक अवस्था ओढवेल, याचे त्रराशिक मांडले, तर असे लक्षात येईल, की निम्म्या पुणेकरांना शहर सोडून जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. असे घडायला नको असेल, तर वेळीच एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन, असा निर्णय जेवढय़ा त्वरेने घेता येईल, तेवढा घेतला पाहिजे. नागरिक इतकेही दूधखुळे नाहीत, की भरपूर पाण्यासाठी हट्ट करतील. प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा. तीच सध्या दिसेनाशी झाली आहे.
एकीकडे पिण्याचे पाणी अपुरे असताना मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्याची अपुरी यंत्रणा पालिकेकडे आहे. खरेतर याकडे अधिक जागरूकपणे लक्ष द्यायला हवे. पण मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पात जुन्या तंत्रज्ञानाने काम करण्यास मान्यता देणाऱ्या पालिकेतील महाभागांना आपण शहराचे आणि मुठा नदीवर अवलंबून असलेल्या अन्य गावांचे किती भयानक नुकसान करीत आहोत, याची जाणीव नाही. काळाबरोबर राहून देशभरात पडणाऱ्या दुष्काळात सहवेदना म्हणून एक वेळ मिळणाऱ्या पाण्यावर पुणेकरांनीही समाधान मानायला हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा