लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे ‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-४ व ५’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (१ ऑगस्ट) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी घोषणा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि उपाध्यक्ष रोहित टिळक यांनी शुक्रवारी केली.

देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात मोलाचे योगदान –

भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे. लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यानंतर दहा हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात टेसी थॉमस यांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे टिळक यांनी सांगितले.

Story img Loader