केसरी-मराठा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कर’ यंदा ‘जन्मभूमी’ चे संपादक कुंदन व्यास यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली. केसरी १३५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ४ जानेवारी रोजी टिळकवाडय़ात वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात संध्याकाळी ६ वाजता हा पुरस्कार केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रु., स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. देशातील आघाडीचे वृत्तपत्र म्हणून ‘जन्मभूमी’ची ओळख असून, व्यास या वृत्तपत्राचे संपादक व जन्मभूमी समूहाचे व्यवस्थापकीय काम करत आहेत. यापूर्वी वीर संघवी, एन. राम, एच. के. दुआ, श्रवण गर्ग, विनोद मेहता आणि मॅमेन मॅथ्यू यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Story img Loader