देशभरात मेट्रो प्रकल्पाची यशस्वी कार्यवाही केल्याबद्दल ‘मेट्रो’मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोकमान्य टिळक यांच्या ९३ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (१ ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता श्रीधरन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
केरळमधील पालक्कड येथे जन्म झालेल्या श्रीधरन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे भारतीय रेल्वे सेवेमध्ये रुजू झाले. भारतातील पहिली मेट्रो म्हणून नावारुपास आलेल्या ‘कोलकत्ता मेट्रो’ची अंमलबजावणी, आराखडा आणि नियोजन करण्यासाठी त्यांनी १९७० मध्ये अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला. ते भारतीय रेल्वे सेवेतून १९९० मध्ये निवृत्त झाले. कोचिन शिपयार्ड लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना ‘एमव्ही राणी पद्मिनी’ या पहिल्या जहाजाची बांधणी करून ते जगासमोर आणण्यात आले. श्रीधरन यांच्या निवृत्तीनंतरही तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांनी त्यांची कोकण  रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या सूचना आणि निर्णयांची अंमलबजावणी करीत जमिनीमधून ८२ किमी लांबीचे सुमारे ९३ बोगदे अचूकपणे झाले. दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झालेल्या श्रीधरन यांनी ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वी आणि मंजूर निधीतूनच काम पूर्णत्वास नेले. फ्रान्सने २००५ मध्ये ‘नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ हा सन्मान त्यांना दिला. त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मविभूषण’ किताब प्रदान करण्यात आले आहेत.

Story img Loader