विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता
पुणे : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या अग्रलेखाद्वारे ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्या हयातीमध्ये साकारण्यात आलेला एकमेव पुतळा पुण्यामध्ये आहे. आरामखुर्चीमध्ये बसलेले लोकमान्य वर्तमानपत्राचे वाचन करीत असताना केशव बाबूराव लेले यांनी १९१९ मध्ये मुंबईच्या सरदार भवन येथे हा पुतळा साकारला होता.
या पुतळ्यानेही शताब्दी पूर्ण केली आहे. लोकमान्यांच्या समोर बसवून साकारलेला एकमेव आणि दुर्मीळ पुतळा हे त्याचे वैशिष्टय़ आहे. सध्या हा पुतळा शिल्पकार लेले यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथील निवासस्थानी ठेवण्यात आला आहे.
या पुतळ्यावरील कपडे आणि हातातील वर्तमानपत्र पाहताना पुतळा जिवंत वाटतो. लोकमान्यांचा खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचणारा पूर्णाकृती पुतळा ही लेले या प्रतिभासंपन्न कलाकाराची एकमेव उरलीसुरली मोठी कलाकृती आहे. गांधीहत्येनंतर समाजकंटकांनी केलेल्या दंगलीत लेले यांचे चलतचित्रे वापरून बनवलेले सर्व आगळेवेगळे देखावे नष्ट करण्यात आले होते.
घरात ठेवलेला असल्याने हा पुतळा तेवढा वाचला. लेले कुटुंबाच्या दादर येथील निवासस्थानी सुमारे ८० वर्षे ठेवलेला हा पुतळा जणू घरातील एक व्यक्तीच झाला होता. त्याची प्रेमाने आणि आपुलकीने काळजी घेतली जात होती, अशी माहिती यशवंत लेले यांनी दिली.
मुंबईच्या दमट हवामानाचा परिणाम होऊन पुतळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून लेले यांनी मुलगी डॉ. चित्रा लेले हिच्या घरी हा पुतळा हलवला.
हवामानाचा परिणाम होऊन पुतळ्याचे थोडे नुकसान झाले होते. प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी २०१५ मध्ये या पुतळ्याचे काळजीपूर्वक नूतनीकरण केले.
शिल्पकार लेले यांच्याविषयी
लोकमान्य टिळकांचा त्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून बनवलेला हा एकमेव पूर्णाकृती पुतळा मूर्तिकार केशव बाबूराव लेले यांनी घडवला आहे. ते उत्तम मूर्तिकार तर होतेच, पण यांत्रिक हालचाली करणारे अनेक पुतळे वापरून एखाद्या प्रसंगाचे हलते-चालते देखावे बनवणे ही त्यांची खासियत होती. ब्रिटिश सरकारने १९२४ च्या लंडनच्या वेम्ब्ली येथील ब्रिटिश साम्राज्य प्रदर्शनात, तसेच १९२६ च्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील स्वातंत्र्याच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त भरवलेल्या जागतिक प्रदर्शनांत आपली कला सादर करण्यासाठी त्यांची निवड केली होती. जुलै १९१९ मध्ये लोकमान्य टिळक मुंबईत सरदार भवनात वास्तव्याला असताना कै . लेले यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पुतळा बनवला. दुर्दैवाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसची धूळ साठून फुप्फु से निकामी झाल्याने लेले यांचे ४३ व्या वर्षीच निधन झाले.
सरदार भवन येथील निवासस्थानी आरामखुर्चीमध्ये बसलेल्या लोकमान्य टिळक यांचा पुतळा साकारला गेला तेव्हा त्यांच्या डोक्यावर पगडी नव्हती. मात्र, टिळक आणि पगडी हे समीकरण असल्याने या पुतळ्यातील टिळक यांच्या डोक्यावर पगडी ठेवण्यात आली आहे.
– यशवंत लेले , शिल्पकार केशव लेले यांचे पुत्र