पुणे : महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भाष्यकार, विविध चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारला सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या तयारीसाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतून भाषेच्या प्राचीनत्वाचे पुरावे संकलित करण्यासाठी आघाडीवर असलेले कार्यकर्ते अशा विविध पातळय़ांवर प्रा. हरी नरके यांनी कर्तृत्व सिद्ध केले होते. लेखक, अभ्यासक, संपादक, समन्वयवादी भूमिकेचे कृतिशील विचारवंत म्हणून प्रा. हरी नरके संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित होते.
हरी रामचंद्र नरके यांचा जन्म १ जून १९६३ रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी त्यांचे शालेय आणि उच्च शिक्षण प्राप्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन नामविस्तार करण्याच्या चळवळीला नरके यांनी पाठबळ दिले. ते राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नरके यांनी काम केले. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या भाषांप्रमाणेच अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. नरके यांनी योगदान दिले. महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्य हा नरके यांच्या अभ्यास आणि संशोधनाचा विषय होता. या अभ्यासातून ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या पुस्तकांचे लेखन त्यांनी केली. नरके यांनी फुले-आंबेडकर कोशाचे लेखन सुरू केले होते. फुले आणि आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा, अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय, त्यांच्या साहित्यावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा परिचय, फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची माहिती असे या कोशाचे स्वरूप होते. इतकेच नव्हे, तर हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती यांचीही माहिती या कोशात समाविष्ट करण्यात येणार होती.
‘लीलावती रुग्णालयावरील आरोप चुकीचे’
प्रा. नरके यांच्या निधनानंतर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. काही महिन्यांपूर्वी नरके यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांच्यावर योग्य निदान झाले नाही, चुकीचे निदान करत उपचार करण्यात आल्याचा आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप समाजमाध्यमातून करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णालयावरील आरोप चुकीचे असल्याचे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. लीलावतीत दाखल असताना मी त्यांनी भेटायला जात होतो. त्यांची योग्य काळजी घेतली जात होती, असेही त्यांनी सांगितले.
चळवळीचे मोठे नुकसान : छगन भुजबळ
प्रा. नरके हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे आणि वैयक्तिकरित्या माझे खूप मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा खरा इतिहास पुढे आणण्याचे काम ते करत होते. अनेक दिवसांपासून आजारी होते. पण, त्यांनी प्रकृतीकडे प्रचंड दुर्लक्ष केले, असे भुजबळ म्हणाले.
जवळचा मित्र गमावला : आ. कपिल पाटील
महात्मा फुले यांच्याविरोधात जेव्हा राळ उठली त्यावेळी हरी नरके यांनी त्याचा प्रतिवाद केला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांचे खरे छायाचित्रही त्यांनीच समोर आणले. फुले-आंबेडकर विचारांचा ध्यास घेऊन ते आयुष्यभर उभे राहिले. माझ्या अडचणीच्या काळातही मला भक्कम साथ देत माझ्या पाठीमागे ते उभे राहिले. आज मी माझा जवळचा मित्र गमावला. त्यांच्या निधनाने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत आमदार कपिल पाटील यांनी शोक व्यक्त केला.
आकस्मिक जाणे वेदनादायक : डॉ. बाबा आढाव
महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्याचा अभ्यास आणि संशोधन हाच जीवनाचा ध्यास घेतलेल्या हरी नरके यांचे आकस्मिक जाणे वेदनादायक आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतमजूर कुटुंबातील धडपणारा मुलगा असलेल्या हरीने आपल्या कर्तृत्वावर शिक्षण पूर्ण केले. हडपसर येथे माझ्या दवाखान्यात हरी नेहमी येत असे. महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ, लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांची चळवळ, मंडल आयोगाची अंमलबजावणी या सर्व चळवळीत हरीचा सहभाग होता. राज्य शासनाच्या समितीवर काम करून त्याने महात्मा फुले साहित्य प्रकाशनाला गती दिली, असे ते म्हणाले.
हरी नरके यांची पुस्तके
महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा
महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन