पोलिसांकडून मुलाची सुटका; खंडणीखोर अटकेत

टिंबर मार्केट परिसरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे वीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या चौघांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका क रण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहरातून हद्दपार करण्यात आलेला एका गुंड सामील असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी सूरज लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. कुंभारवाडा, सातारा), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. चुडामण तालमीनजीक, भवानी पेठ), फरदीन परवेझ खान (वय १९, रा. कोंढवा खुर्द), साहिल अब्दुल शेख (वय २३, मिठानगर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे दोन साथीदार शाहबाज खान आणि सुयश वाघमारे पसार झाले असून पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या बाबत ५९ वर्षीय व्यापाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्यापाऱ्याचे टिंबर मार्केट परिसरात बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांचा २९ वर्षीय मुलगा दुचाकीवरून कामानिमित्त निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. टेम्पोतून मुलाला घेऊन आरोपी पसार झाले.  दरम्यान, किरकोळ कामासाठी बाहेर पडलेला मुलगा दुकानात न परतल्याने व्यापाऱ्याने मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्याचा मोबाइल क्रमांक बंद होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास व्यापाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर आरोपीने संपर्क साधला. त्यानंतर आरोपी त्या वेळी व्यापाऱ्याच्या शाहबाज खान आणि सुयश वाघमारे व्यापाऱ्याच्या घरी आले. तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, सुटकेसाठी वीस कोटी रुपये द्यावे लागतील, असे दोघांनी व्यापाऱ्याला सांगितले. व्यापाऱ्याला धमकावून दोघे तेथून गेले.

शाहबाजचे वडील व्यापाऱ्याच्या ओळखीचे आहेत. त्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर व्यापाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून आरोपींनी धमकावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या व्यापाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तडजोडीत आरोपींनी पंधरा लाख रुपये देण्याची मागणी केली. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतर तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना अटक केली. आरोपी शाहबाज, अरबाज, सुयश सराईत आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अरबाजला पोलिसांनी हद्दपार केले होते. व्यापारी आरोपींना ओळखत होते. व्यापाऱ्याकडे पैसे असल्याने मुलाचे अपहरण करण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आरोपी असे जेरबंद झाले..

आरोपींनी व्यापाऱ्याला खंडणीची रोकड घेऊन आरोपींनी शहराच्या वेगवेगळय़ा भागात बोलावले. मध्यरात्री व्यापाऱ्याला कोंढवा भागात बोलावले. आरोपींनी व्यापाऱ्याच्या मुलाला टेम्पोत डांबून ठेवले होते. सूरज चव्हाण कोंढव्यात पैसे घेण्यासाठी आला. तेथे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक निरीक्षक पवार, पाटील आणि पथकाने सापळा लावला होता. त्यांनी सुरुवातीला चव्हाणला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदारांना कुणकुण लागताच ते टेम्पोतून कात्रजच्या दिशेने पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम आणि पथकाने टेम्पोचा पाठलाग केला. पोलिसांनी टेम्पो थांबवण्याची सूचना दिल्यानंतर आरोपींनी टेम्पो थांबवला नाही. पोलिसांनी पुन्हा पाठलाग करून पोलिसांनी उर्वरित तीन आरोपींना पकडले आणि त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.