प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी

गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले आणि मंडळांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी एकमुखी मागणी शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. डीजेसंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमावलीचा एक मसुदा तयार करून तो सर्व आमदारांना देत त्यांच्यामार्फत शासनाकडून मान्य करून घ्यावा, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि खटल्यांसंदर्भात विचारविनिमय करून कायदेशीर मार्ग काढण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, सहकार तरुण मंडळाचे अध्यक्ष भाऊ करपे, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेविका रूपाली पाटील आणि बैठकीचे निमंत्रक संजय बालगुडे यांच्यासह अडीचशे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. या संदर्भात १५ दिवसांनी अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरामध्ये बैठक घेण्यात येणार आहे.

विविध मंडळांच्या मांडव आणि कमानीचे पैसे देण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्याचे स्मरण त्यांना करून देण्यात येणार आहे. त्याची पूर्तता न झाल्यास मंडईतील टिळक पुतळ्यापाशी उपोषण करण्यात येणार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी गणेशोत्सव कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गणेश मंडळांनी या समितीकडे अर्ज करायचे आणि समिती महापालिका, पोलीस दलासह विविध परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे ठरविण्यात आल्याचे बालगुडे यांनी सांगितले.