आरोपींना पोलीस कोठडी

आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणावर चांदणी चौकात गोळीबार झाल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने शुक्रवारी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर यापूर्वीही गोळीबार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आकाश लहू तावरे (वय २२), सागर लहू तावरे (वय २४), सागर रामचंद्र पालवे (वय २४, तिघे रा. रांझे गाव, ता. भोर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात तावरेचा काका राजेंद्र शिवाजी तावरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावरे आणि पालवे यांनी पिस्तुलातून तुषार प्रकाश पिसाळ (वय ३०) याच्यावर चांदणी चौकात दोन दिवसांपूर्वी गोळीबार केला होता. गोळीबारात जखमी झालेल्या पिसाळवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिसाळ याच्यावर यापूर्वी हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. आकाश तावरे याला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फरासखाना पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी त्याच्याकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली होती. तावरे यांच्या नात्यातील युवतीबरोबर पिसाळने विवाह केला होता. तेव्हापासून आरोपी त्याच्यावर चिडून होते. त्याला धमकावण्यात येत होते. आरोपींनी १२ जुलै २०१८ मध्ये पिसाळवर गोळीबार केला होता. त्या वेळी तो बचावला होता. या प्रकरणी तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने तिघा आरोपींना गुरुवापर्यंत (१६ मे) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.