अल्पवयीन मुलांचा सहभाग; तीन दिवसात चौथी घटना

पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरून तसेच पूर्ववैमनस्यातून तोडफोड होण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्री निगडी येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी परिसरातील ११ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात तोडफोडीची ही चौथी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास निगडी यमुनानगर, ओटा स्कीम, सिद्धीविनायक नगर येथील ११ वाहनांना लक्ष करण्यात आले. आरोपींनी कोयते तसेच लाकडी दांडक्यांचा वापर तोडफोडीसाठी केला. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहरात सातत्याने तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. गेल्या तीन दिवसातील ही चौथी तोडफोडीची घटना आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस निष्क्रिय ठरत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader