पुणे : राज्यात मुंबईनंतर महत्त्वाचे महानगर अशी पुण्याची ओळख आहे. माहिती-तंत्रज्ञान (आयटी), वाहन उद्योग अशी पुण्याची ओळख आहे. त्यात आता वैद्याकीय केंद्र अशी नव्याने ओळख होऊ लागली आहे. करोना आणि त्यानंतर पुण्याच्या आसपासच्या जिल्ह्यांतून पुण्यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी पुण्यातील वैद्याकीय यंत्रणेवरील ताणही वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे? हवामान विभागाने दिली माहिती…

शहरात ससून, आरोग्य विभागाचे औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू, तर पिंपरी- चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण अशी चार प्रमुख सार्वजनिक रुग्णालये आहेत. ग्रामीण भागातही सरकारी रुग्णालये आहेत. याशिवाय शहरासह जिल्ह्यात सुमारे ७८० खासगी रुग्णालयांचे मोठे जाळे आहे. यांमध्ये सुमारे १८ हजार ९०० साध्या, अडीच हजार अतिदक्षता, तर कृत्रिम श्वसन यंत्रणेची सुविधा असलेल्या ८०० खाटा आहेत. पुणे महापालिकेचे वैद्याकीय महाविद्यालय आणि कमला नेहरू रुग्णालय अशी संयुक्तपणे रुग्णांना सेवा दिली जाते. येथे अतिदक्षता विभागात १७ खाटा असून, दररोज पाच ते आठ रुग्ण दाखल होतात. औंध जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व विभाग मिळून ३०० खाटांची सुविधा आहे. करोनाकाळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह नगर, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक रुग्ण पुण्यात उपचारासाठी दाखल होत होते. तेव्हा राज्य सरकारच्या पुण्यातील आरोग्य यंत्रणेने कात टाकली होती. पुण्याची वाढती लोकसंख्या, ग्रामीण रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळे शहरातील रुग्णालयांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत आहे.

हेही वाचा >>> खरीप हंगामासाठी मुबलक खते… राज्याला किती खत मिळणार?

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील वडगाव, हडपसर आणि खराडी येथील सुमारे २६५० घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी करण्यात आले. या योजनेंतर्गत उपलब्ध घरे आणि प्राप्त अर्ज यांत मोठी तफावत आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ९३८ घरांसाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने सुमारे १५ हजार घरे मंजूर असून, त्यांपैकी ११ हजारांपेक्षा जास्त घरे तयार झाली आहेत. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत स्वत:च्या मालकी जागेवर वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी १९ हजार लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात १५७३ किलोमीटरचे रस्ते तयार केले आहेत. पुणे जिल्हा मुंबईला आणि आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते, लोहमार्गाने जोडला आहे. एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी १३ हजार ६४२ किलोमीटर असून एकूण लांबीपैकी ३३१ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे, तर १३६८ किलोमीटर राज्य महामार्ग आहे. गावातील रस्त्यांची एकूण लांबी ६५५५ किलोमीटर आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग, काही प्रमाणात राज्य महामार्ग सोडल्यास जिल्हा मार्ग, जिल्हा रस्त्यांची अवस्था फार चांगली म्हणावी अशी नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta district index analysis of pune district development urban growth in pune development plans for pune zws
Show comments