या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला पुढे नेमके काय करायचे हे समजत नसते. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्यापेक्षाही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची अचूक माहिती त्याच्यासमोर ठेवून समोरासमोर बसून चर्चा करणे आवश्यक असते. मुलांनी घेतलेला निर्णय मोठय़ा मनाने स्वीकारण्याची तयारीही पालकांनी ठेवली पाहिजे. कोणते क्षेत्र निवडायचे याचा निर्णय घेताना आई-वडील खंबीरपणे पाठिशी आहेत हा आत्मविश्वास मुलांना मिळाला, तर तेही पालकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जिवाचे रान करतील. पालकांनी मुलांचे मित्र झाले पाहिजे. पुढच्या आठवडय़ात दहावीचा निकाल लागणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर करीअरची निवड या विषयासंबंधी करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला..

  • दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना करीअरचा निर्णय घेण्याइतपत समज असते का?

खरे सांगायचे तर, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला फार काही कळत नाही हे वास्तव आहे. वेगवेगळ्या करीअर संधींविषयी त्याला आकर्षण जरूर असते, पण त्याविषयीची विस्तृत माहिती त्याच्याकडे नसते. वयाने लहान असल्यामुळे त्याला ही माहिती नाही हे समजू शकतो, पण त्याच्या पालकांकडेही ही माहिती नसते. अशा वेळी दोनच पर्याय असतात. आपल्या ओळखीतील कोणी काय केले आहे याची माहिती घेऊन किंवा बरोबरीचे मित्र कोणत्या शाखेकडे जाणार यावरच हे निर्णय घेतले जातात. अशा वेळी निर्णय चुकला तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर कोणापाशीच नसते.

  • कोणत्या शाखेमध्ये जावे हे कसे ठरवावे?

आपली शिक्षण पद्धती परीक्षेत गुण पाडण्याची कला शिकविते. ‘घोका आणि ओका’ हेच त्यामागचे सूत्र असते. त्यामुळे पालकांनी मुलांकडून एक सराव करून घ्यावा. दहावीपर्यंत जेवढे विषय शिकले त्यांचे आवडलेले विषय, मध्यम आवडलेले विषय आणि अजिबात न आवडलेले विषय अशी तीन गटात विभागणी करावी. त्यामुळे न आवडलेले विषय आपोआप बाद होतील. मुलांना दहावीपर्यंत विषय निवडण्यामध्ये कोणताही पर्याय नव्हता. मात्र, पुढच्या शिक्षणामध्ये न झेपणारे विषय तातडीने बाद करणे शक्य असते. मला एखादा विषय झेपत नाही हे मुलांनी पालकांना मोकळेपणाने सांगितले पाहिजे. तरच, भावी काळातील अभ्यासाची निवड करणे सोयीचे आणि नंतर निवडलेल्या विषयांचा अभ्यास करणे आनंदाचे होईल.

  • पालक अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतात का?

आपल्या कुटुंबव्यवस्थेमध्ये पालक अपेक्षांचे ओझे लादत नाहीत आणि मुलालाही फार काही कळत नाही. सध्याच्या काळात ‘तू म्हणशील ते आम्हाला मान्य’ असे पालकांनी म्हणण्याची फॅशन झाली आहे, पण मुलालाही नेमकेपणाने काही ‘म्हणता’ येत नाही. त्यामुळे पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून अभ्यास करण्यासाठीची शाखा निवडावी. त्यामुळे मुलगा दबावाखाली येत नाही. त्यालाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य उपभोगता येते. अजून निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. साऱ्या गोष्टी निकालानंतर आणि मिळणाऱ्या गुणांवर अवलंबून ठेवू नयेत.

  • विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवडावी?

इतके टक्के मिळाले तर विज्ञान शाखेला, अमूक टक्के मिळाले तर वाणिज्य शाखेला आणि कमी गुण मिळाले तर कला शाखेला प्रवेश घ्यायचा या पारंपरिक ठोकताळ्यातून बाहेर पडले पाहिजे. वकिली, हॉटेल मॅनेजमेंट, फाईन आर्ट, स्पर्धा परीक्षा, परकीय भाषा, मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अशा विविध अभ्यासक्रमाच्या संधी या बारावीनंतर खुल्या होतात. त्याचप्रमाणे बारावीपर्यंत मॅथ्स विषय असेल तर आर्किटेक्चरला जाता येते. त्यामुळे कोणता अभ्यासक्रम निवडायचा हे निश्चित केले असेल तर बारावीपर्यंत शाखा कोणतीही असली तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. अर्थात हे विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी तरी पालकांनी आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. तरच, मुलांना करीअर निवडणे सोपे होऊ शकेल.

  • पालकांनी कोणती दक्षता घ्यावी?

पालकांनी मुलांना निर्णयाप्रत येण्यास मदत केली पाहिजे. मुलगा घेईल तो निर्णय आनंदाने स्वीकारून त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. एखाद्याला भाषेमध्ये रस असेल तर ‘भाषा घेऊन काय करणार’ असा प्रश्न विचारून त्याला नाउमेद करू नये. एखादा करीअरचा पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये मुलाला काय साध्य करता येऊ शकेल याचा आलेख त्याच्यासमोर मांडला पाहिजे. केवळ ऐकीव माहितीपेक्षाही अचूक माहितीवर भर दिला तर मुलांनाही निर्णय घेणे सोपे होऊ शकेल. शंभर टक्के निकाल लागावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या शाळा मुलांना करीअरविषयी मार्गदर्शन करीत नाहीत. महाविद्यालयांना त्यामध्ये फारसे स्वारस्य नसते. या मधल्या टप्प्यामध्ये पालकांनी मुलांचे मित्र झाले पाहिजे.

मुलाखत : विद्याधर कुलकर्णी