मुलाखत – भक्ती बिसुरे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे अनुभव आणि संस्कारांची शिदोरी देणारी शाळा असते असं म्हणतात. अनेक तरुण कार्यकर्त्यांचा सामाजिक कामातला वावर गणेशोत्सव मंडपात लहान-मोठी कामं करण्यापासून सुरू होतो. अशी कामं करणारा एखादा कार्यकर्ता त्याच्या सामाजिक जाणिवेतून आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर असं काम हातात घेतो की लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांना त्याचं किती कौतुक करू आणि किती नको असं होऊन जातं. ‘सेवा मित्र मंडळ ट्रस्ट’च्या शिरीष मोहिते यांनी गेली वीस वर्षे हाती घेतलेला ‘मामाच्या गावाची सफर’ हा उपक्रम अशाच कौतुकास्पद उपक्रमांपैकी एक आहे. या उपक्रमाविषयी शिरीष मोहिते यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न – सामाजिक कामाची सुरुवात कशी झाली ?
उत्तर – गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून माझं काम सुरू झालं आणि आजही गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनच मी हे काम करत आहे. गणेशोत्सवाच्या काळात काम करत असताना काका वडके, आनंद सराफ, डॉ. मिलिंद भोई यांचं काम जवळून बघत होतो. त्यांच्या सामाजिक जाणिवा, काम करताना ते राबवत असलेले उपक्रम आणि त्यांच्या कल्पना बघताना मीही शिकत होतो. त्यातून प्रेरणा मिळाली आणि सामाजिक कामात सक्रिय झालो.
प्रश्न – मामाच्या गावाची सफर या कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली?
उत्तर – गणेशोत्सवाच्या कामाचा भाग म्हणून मी विविध अनाथाश्रमांमध्ये जात असे. तिथे गेल्यानंतर लहान मुलांचं तिथलं जगणं बघून अंतर्मुख व्हायला होत असे. अनाथाश्रमांतून राहाणाऱ्या मुलांची परिस्थिती तेव्हा आजच्या एवढी सुसह्य़ नव्हती. समाजातसुद्धा अनाथाश्रमातल्या मुलांबद्दल जागरूकता नव्हती. त्यामुळे ही मुलं नेहमी उपेक्षितच असत. त्यांच्यासाठी काय करता येईल या विचारातून हा उपक्रम सुरू केला.
प्रश्न – या उपक्रमाविषयी काय सांगाल?
उत्तर – गेली वीस वर्षे हा उपक्रम यशस्वी रीत्या सुरू आहे. पहिल्या वर्षी अखिल मंडई मंडळ आणि सेवा मित्र मंडळ या दोन गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला. पुढे सेवा मित्र मंडळातर्फे तो सुरू झाला.
प्रत्यक्षात मात्र सगळ्याच गणेशोत्सव मंडळांचं, जैन समाज मंडळाचं, शहरातल्या नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबांचं मोलाचं सहकार्य या उपक्रमाला दरवर्षी मिळतं. सुट्टीत मामाच्या गावी गेल्यावर जी मजा, मस्ती, गंमतजंमत आपण अनुभवतो तीच या मुलांना अनुभवायला मिळावी, त्या बरोबरीने सामाजिक जाणिवांबाबत देखील माहिती मिळावी या उद्दशाने कार्यक्रमांची आखणी केली जाते. बँडच्या आवाजात, घोडे आणि उंटांवर बसवून मुलांचं स्वागत केलं जातं. आवडीचे खाद्यपदार्थ आधी विचारून घेऊन ते आवर्जून तयार करून त्यांना खाऊ घातले जातात. अग्निशामक दलाचं काम, पोलीस दलाचं काम देखील मुलांना दाखवलं जातं.
प्रश्न – या वर्षीच्या कार्यक्रमांचं मुख्य वैशिष्टय़ काय?
उत्तर – सव्वाशे मुलं या वर्षी मामाच्या गावी आली आहेत. अनेक वर्ष इथे येणाऱ्या दृष्टिहीन आणि दिव्यांग तरुण-तरुणीचा विवाह या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. ऑर्केस्ट्रा, विवाहपूर्व मेंदी कार्यक्रम असे कौटुंबिक सोहळ्यांचे अनुभव या वर्षी मुलांना देणार आहोत. चार वर्षांपूर्वी ज्या अंध भगिनीचा विवाह झाला, तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचे नामकरण या मुलांच्या उपस्थितीत होणार आहे.
प्रश्न – मुलांचा प्रतिसाद कसा असतो?
उत्तर – सर्वसाधारणपणे अनाथाश्रमात राहताना न मिळणारे अनुभव इथल्या मुक्कामात मिळतात. त्यामुळे मुलं मजेत असतात. प्रत्येक नवीन गोष्ट अनुभवून पाहण्याची उत्सुकता, कुतूहल त्यांच्यामध्ये असतं. वर्षभर काही ना काही निमित्ताने त्यांच्या संस्थेत जाऊन त्यांना भेटून संपर्कात राहाण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्या वेळी मामा म्हणून येऊन बिलगतात, तेव्हा या सगळ्या उपक्रमाचं सार्थक होतं.
प्रश्न – या प्रवासात मिळालेली सगळ्यात महत्त्वाची शाबासकी कोणती ?
उत्तर – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना या वर्षीच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाचं तोंडभरून कौतुक केलं, आशीर्वाद दिले आणि मोगऱ्याच्या फुलांनी दृष्ट काढावी असं काम आहे असं म्हणत शाबासकी दिली. यापेक्षा मोठी कौतुकाची थाप दुसरी काय असणार, त्यामुळे पुढची अनेक वर्ष हा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी पाठबळ मिळालं आहे.