११ डिसेंबरला विभागीय अंतिम फेरी रंगणार
‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीसाठीची महाविद्यालयीन नाटय़संघांची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. रविवारी (११ डिसेंबर) भरत नाटय़ मंदिर येथे अंतिम फेरी रंगणार आहे. अंतिम फेरीत महाअंतिम फेरीचा दावेदार कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन कलेच्या क्षेत्रात धडपडणाऱ्या सर्जनशील विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळणाऱ्या या स्पर्धेने आता राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. पुणे विभागीय अंतिम फेरीत सहा एकांकिका सादर होणार असून, त्यातील एका एकांकिकेला महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल.
अभिनय, वाचिक अभिनयावर बारकाईने काम, नेपथ्याची रंगरंगोटी, प्रकाशयोजनेचे डिझाईन, संगीत अशा सगळ्याच बाजूंवर पुन्हा एकदा लक्ष देऊन झाले आहे. प्रत्येक गोष्ट अचूक होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्यामुळे अंतिम फेरी चुरशीची होईल.
विनामूल्य प्रवेशिकांसाठी..
अंतिम फेरीच्या विनामूल्य प्रवेशिका लोकसत्ता, एक्स्प्रेस हाउस, प्लॉट नं. १२०५/२/६, संभाजी बागेसमोर, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर येथे उपलब्ध आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या प्रवेशिका दिल्या जातील. अंतिम फेरीच्या दिवशी ११ डिसेंबरला दुपारी साडेतीननंतर भरत नाटय़ मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेशिका दिल्या जाणार आहेत.
अंतिम फेरीसाठी निवड झालेले संघ
फर्ग्युसन महाविद्यालय (आशा), बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (दोन पंथी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय (अंधार), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय (अफसाना), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेरीटेल), स. प. महाविद्यालय (बातमी क्रमांक एक करोड एक)
प्रायोजक
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून, ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.