‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी मिळणारी संधी ही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विविध घटना, विषय यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहणाऱ्या तरूणाईच्या आविष्कारांमधून नवे काही पाहण्याची आणि शिकण्याचीही संधी मिळाली, असे मत स्पर्धेचे परीक्षक आणि उपस्थितांनी व्यक्त केले.
विद्याधर पाथरे
‘‘मी जयदेव हट्टंगडी यांच्या कार्यशाळेमुळे एकांकिका, नाटकाशी जोडला गेलो. आमच्या कार्यशाळांचा शेवट हा अशाच एखाद्या छोटय़ाश्या नाटकाने व्हायचा आणि पुढे त्याचे रुपांतर एखाद्या चांगल्या संहितेत व्हायचे. या स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्या प्रक्रियेशी जोडले जाताना आणि त्यात स्वत:चा शोध घेताना खूपच छान वाटते आहे.  आपण कुठे आहोत हे जोखायचे असेल, तर उंचीवरून गर्दीकडे पाहा आणि आपण कुठे आहोत याचा शोध घ्या, असे मला या तरूणांना आवर्जून सांगावेसे वाटते.’’
प्रतिमा कुलकर्णी
‘‘नाटक समजण्यासाठी, करण्यासाठी जी प्रगल्भता आवश्यक आहे, ती या विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित नाहीये. ती अनुभवानेच येते. मात्र, एखाद्या साध्या-सरळ वाटणाऱ्या, रोजच्या चर्चेतल्या मुद्दय़ाकडे ही मुले खूप वेगळ्या पद्धतीने पाहतात, हे या स्पर्धेतून प्रकर्षांने दिसले. . अनेकदा नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना यांच्या भपक्यात खऱ्या क्षमता समोर येत नाहीत. मात्र, इथे आपल्याला काय मांडायचे आहे, ते प्रेक्षकापर्यंत मर्यादित साधनांतून पोहोचवताना विद्यार्थ्यांचा कस लागला. त्यामुळे हे विद्यार्थी जसे आहेत, तसे समोर आले. त्यांच्यातील क्षमता समोर आल्या. विद्यार्थ्यांनी मूकनाटय़ासारख्या तंत्राचा वापर करून केलेले सादरीकरणही नोंद घ्यावी असे आहे.’’
सुनील बर्वे
‘‘माध्यमांनी अशा प्रकारच्या स्पर्धा आवर्जून आयोजित केल्या पाहिजेत. अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांसाठी कवाडं खुली होतात. त्यांना स्वत:ला जोखता येतं, त्यांच्यातल्या क्षमतांचा त्यांना शोध लागतो. फक्त शहरांतच नाही, तर अनेक ठिकाणी टॅलेंट लपलेले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, ते सर्वासमोर आणण्यासाठी राज्यभरात अशा स्पर्धाचे आयोजन झाले पाहिजे.
प्रसन्नकुमार अकलूजकर
‘‘ काल्पनिक आणि वास्तविक विषयांचा उत्तम मिलाफ या स्पर्धेत पाहायला मिळाला. ध्वनिक्षेपक नसताना आवाजाची फेक कशी असावी, आवाजाचा वापर कसा करावा याचीही चांगली उदाहरणे या स्पर्धेत दिसली. छोटय़ा जागेत, मर्यादित साहित्यासह एकांकिका करता येऊ शकते, हे समोर येण्यासाठी हे प्रारूप उपयुक्त ठरेल. वाचिक अभिनयाची पारखही या प्रारूपातून चांगली करता येऊ शकते.’’
सुषमा जोग – सावरकर
‘‘ तरुणाईचे भावविश्व या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता आले. मी ही सगळी प्रक्रिया खूपच एन्जॉय केली. मात्र, विद्यार्थ्यांना काही अंशी अजून मार्गदर्शनाची गरज आहे. बाहेरगावाहून आलेल्या संघांना स्पर्धेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन करण्याची गरज आहे.’’
प्रवीण तरडे
‘‘पुण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये, छोटय़ा गावांमध्ये एकांकिका पोहोचायला हव्यात. त्यासाठी ‘लोकसत्ता’ सारख्या माध्यमाने उपलब्ध करून दिलेली संधी खूपच उपयोगी ठरणारी आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये असल्यामुळे संघांना स्वत:चे सादरीकरण सुधारायला संधी मिळते. छान वातावरणात या स्पर्धा झाल्या. त्याचाही सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो.’’
अश्विनी परांजपे
‘‘पुण्याबाहेरही खूप टॅलेंट आहे. मात्र, बाहेरील संघांना तांत्रिकदृष्टय़ा थोडय़ा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे भाषेचा, त्याचा लहेजाचा वापर आणि विषयांतील वैविध्य यांमुळे स्पर्धेच्या पलीकडे जाऊन कलाकार एकमेकांकडून शिकत असतात. त्यासाठी या स्पर्धेचे व्यासपीठ उपयोगी ठरेल.’’

Story img Loader