‘सेट आला का. अमुक कुठे आहे. अशी सुरू असलेली लगबग, उदंड उत्साह, थोडीशी धाकधुक, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षां पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी.. अशा सळसळत्या तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदी रविवारी पुण्यातून झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नावीन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्टय़ ठरले. पुणे विभागीय अंतिम फेरीसाठी पाच संघांची निवड करण्यात आली असून ७ डिसेंबर रोजी ही फेरी रंगणार आहे.
राज्यभरातील आठ केंद्रांवर सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीपासून झाली. या फेरीसाठी प्रसन्नकुमार अकलुजकर, सुषमा जोग-सावरकर, अश्विनी परांजपे आणि प्रवीण तरडे या दिग्गजांनी परीक्षण केले. यावेळी या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाथरे आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा 30lokankika3कुलकर्णीही युवा रंगकर्मीची पारख करण्यासाठी उपस्थित होते. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ ची साथ मिळाली आहे. त्याचप्रमाणे केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ऑईल यांचाही स्पर्धेच्या आयोजनात मोठा वाटा आहे.
पुण्यातील प्राथमिक फेरीच्या स्पर्धा केंद्रावर मोठय़ा उत्साहात स्पर्धेला सुरुवात झाली. पुणे शहराबरोबरच सोलापूर, इस्लामपूर, बारामती या ठिकाणांहून महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. बारा महाविद्यालयांच्या संघानी या स्पर्धेत आपला आविष्कार सादर केला. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. डोंबाऱ्याचा खेळ, गुन्हेगारांकडे पाहण्याची सामाजिक मानसिकता, जादूचे प्रयोग करणाऱ्यामागे दडलेला माणूस, दुभंग व्यक्तिमत्त्व (मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर) यांसारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. भारताची प्रतिज्ञा नेमकी लिहिली कुणी, या विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या एकांकिकेसह आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी एका चाहत्याने केलेली गंमत अशा अगदी आसपास दिसणाऱ्या घटनांतील नाटय़ हेरून विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. सामाजिक वास्तव, त्याच्याकडे पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन असे थोडेसे गंभीर झालेले वातावरणही या युवा रंगकर्मीनीच हलके केले. भावाच्या नात्यामधील सुखावणारे बंध आणि नात्याची खटय़ाळ वीण मूकनाटय़ातून मांडली गेली, तर व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेतील ‘चिट्टी’ने स्पर्धेत धमाल उडवून दिली. भारलेल्या वातावरणात प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनी हजेरी लावली आणि स्पर्धकांच्या उत्साहाला आनंदाचे भरते आले.
स्पर्धकांमध्ये रंगलेल्या चुरशीने निकालाची उत्कंठा वाढत गेली. सहभागी झालेल्या बारा संघांमधून पाच संघांची निवड ७ डिसेंबर रोजी भरत नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, म्हणजेच महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी होणार आहे. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण झी मराठीवरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमातही पाहता येणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीचा निकाल indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
पुणे विभागीय अंतिम फेरीत निवड झालेली महाविद्यालये आणि एकांकिका
गरवारे वाणिज्य महाविद्यालय (रूह हमारी)
स. प. महाविद्यालय (विल ऑफ द विशस)
मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय (मोटीव्ह)
आयएलएस विधी महाविद्यालय (चिट्टी)
मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय (फोटू)

Story img Loader