पुणे : परीक्षा, अभ्यासाचे नियोजन सांभाळत गेल्या काही दिवसांपासून कसून तालीम केल्यानंतर आता प्रत्यक्ष सादरीकरणाची वेळ आली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पुणे विभागीय प्राथमिक फेरी आज (३० नोव्हेंबर) आणि उद्या (१ डिसेंबर) होणार आहे. महाविद्यालये, विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद लाभला असून, दमदार सादरीकरणासाठी विद्यार्थी रंगकर्मी सज्ज झाले आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही विद्यार्थ्यांना त्यांचे नाट्यगुण सादर करण्यासाठीची राज्यातील महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळेच राज्यभरातील आंतरमहाविद्यालयीन नाट्यविश्वात ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची वेगळी ओळख आहे. सिने-नाट्यसृष्टीतील जाणकारांचे लक्ष या स्पर्धेकडे असल्याने या स्पर्धेतील कलाकारांना नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते हे ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील महाविद्यालयांकडून एकांकिकांमध्ये केले जाणारे प्रयोग आगळेवेगळे असतात. त्यामुळे दरवर्षीच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चुरस पाहायला मिळते.

हेही वाचा >>>पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी

यंदाही या स्पर्धेला विद्यार्थी, महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता पुणे विभागीय प्राथमिक फेरीत कमालीची चुरस होणार आहे. विद्यार्थ्यांची ऊर्जा, उत्साहात पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी तालीम स्वरूपात आज आणि उद्या रंगणार आहे. शास्त्री रस्ता येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालय येथे ही प्राथमिक फेरी होणार आहे. या फेरीत सादरीकरण केलेल्या संघांपैकी निवडक संघांना विभागीय अंतिम फेरीची दारे खुली होणार आहेत. त्यामुळे प्राथमिक फेरीत दमदार सादरीकरण करून विभागीय अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी रंगकर्मी विद्यार्थी त्यांचे कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू प्राधिकरण

सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स

पॉवर्ड बाय : एन. एल. दालमिया

सहाय्य : अस्तित्व

टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स