सुरक्षित शहर हा एके काळचा लौकिक गळून पडलेल्या शहरातील अगदी परवाचाच हा एक संवाद. विशीतील एक मुलगी रात्री उशिरा एकटी घरी जाणार म्हणून तिला मिळत असलेले सल्ले पुढीलप्रमाणे होते…

सल्ला १ : शक्यतो, अमुक रस्त्यावरून जाऊ नकोस, तिथे अंधार खूप असतो.

सल्ला २ : अमुक रस्ता टाळून तमुक रस्त्याने गेलीस, तरी तेथे मद्यपींचा वावर असतो, त्यामुळे जरा जपूनच.

सल्ला ३ : एवढ्या उशिरा शक्यतो एकटी फिरतच जाऊ नकोस ना! हल्ली हे शहर पूर्वीसारखे राहिलेले नाही.

हे सल्ले ऐकून सध्याचे पुण्याचे वास्तव असेच आहे, हे नाकारायची कुणाचीच हिंमत होणार नाही. पण, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलीही रात्री सुरक्षितपणे फिरू शकतात, असे या शहराबाबत म्हटले जात होते, हे कसे विसरणार, असा प्रश्नही पडत राहील. गेल्या अडीच दशकांत शहराच्या लौकिकात झालेला हा बदल या शहरावर प्रेम करणाऱ्या कुणालाही विषण्ण करणाराच आहे. गेल्या २५ वर्षांत पुण्यात घडलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणातील अनेक नावे झर्रकन डोळ्यांसमोरून जातात आणि शहराचे ‘सुरक्षित’ हे विशेषण गळून पडल्याचे जाणवून बधिरता येते. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण उघडकीस आले, त्याच्या काहीच दिवस आधी बोपदेव घाटात मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने पुण्याच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणातील आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणे गरजेचेच. पण, ज्यांना या भीषण प्रकाराला सामोरे जावे लागले, त्यांच्या मनावरच्या जखमांचे काय? आणि या प्रकारांमुळे ज्या पालकांना मुली आहेत, त्यांना वाटू लागलेल्या, वाटत राहणाऱ्या आणि मन अक्षरश: पोखरून काढणाऱ्या काळजीचे काय? उद्या ही परिस्थिती कुणावरही येईल, असे जर शहराचे चित्र तयार होत असेल, तर ते भूषणावह नाही. शहरात फिरताना रात्रीची वेळ अजिबात योग्य नाही, दिवसाढवळ्याही काही जागा सुरक्षित नाहीत आणि एरवी हे सर्व टाळायचे म्हटले, तर गर्दीतून प्रवास करताना होणारे नकोसे स्पर्श, वाहन चालवताना झेलाव्या लागणाऱ्या किळसवाण्या नजरा, रस्त्यावरून चालतानाही केल्या जाणाऱ्या अश्लाघ्य टिप्पण्या असेच जर महिलांच्या वाट्याला येत असेल, येणार असेल, तर कोणत्या तोंडाने या शहराला सुरक्षित म्हणायचे? हे झाले घराबाहेर पडल्यावरचे वास्तव. तिकडे समाज माध्यमांच्या आभासी मंचांवरही हेच. त्यावरही शेरेबाजी, धमक्या आणि चारित्र्यहनन. कार्यालयीन कामकाजांमध्येही अनेक ठिकाणी भेदभाव आणि असमानता. गेल्या दोन महिन्यांत पुण्यात बलात्काराच्या ६९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरी एक गुन्हा दररोज घडतो आहे, हे आज शहरातील वास्तव आहे आणि ते गंभीर आहे.

आता कुणी म्हणेल, की या सगळ्याची दखल संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी आणि कारवाई करायला हवी. तसे नक्कीच व्हायला हवे. पण, केवळ त्याने हे प्रश्न सुटणार नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या आयामांची चर्चा करताना, अनेकदा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत, त्यासाठी कशी तरतूद केली आहे, याची माहिती व्यवस्थेकडून दिली जाते. ते आवश्यकच. पण, त्या जोडीने, महिलांवर अत्याचार होऊ नयेत, ही पुरुषांचीही जबाबदारी आहे, असे कुणी का म्हणत नाही? स्त्रीशी आदरानेच वागायचे असते, हे घरातल्या मुलग्यांच्या, पुरुषांच्या मनावर कायमचे बिंबवणे ही महिला सक्षमीकरणाप्रति समाज म्हणून आपली जबाबदारी नाही का?

स्त्रीच्या शरीराचाच नाही, तर मनाचाही आदर करायला मुलग्यांना शिकवणे, याची आज नितांत गरज आहे. भाजीत कमी-जास्त झालेल्या मिठापासून गाडी चालविण्यापर्यंतच्या कृतींची टिंगल करणाऱ्या पुरुषांनी एकदा पूर्ण वेळ गृहिणी बनून किंवा घर सांभाळून काम करणारी कमावती स्त्री होऊन पाहावे. म्हणजे, अशा टिंगलीतून मनाला होणाऱ्या जखमा काय असतात, तेही समजेल आणि कामाच्या बाबतीत खरे सक्षम कोण असते, याचेही उत्तर मिळेल. याचा अर्थ सर्वच पुरुष असंवेदनशील असतात, असे नाही. समंजसही अनेक असतात, आहेत. हा समंजसपणा अधिक सार्वत्रिक व्हावा, ही या महिला दिनी अपेक्षा आहे. तसे झाले, तर लेखाच्या सुरुवातीला उद्धृत केलेला संवाद बदलू शकतो आणि ‘सुरक्षित शहर’ हा लौकिकही परत मिळू शकतो. सध्या तरी शहर त्याची वाट पाहते आहे…

siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader