सर्वसाधारणपणे पुण्याच्या प्रश्नांबाबत बोलणाऱ्या या सदरात शहरात झालेल्या एका प्रायोगिक नाटकाविषयी लिहावे का, असा प्रश्न पडला न पडला, तोच त्याचे मनात, ‘हो, लिहावे; कारण त्यातील विचारबिंदूंचे ठिबकसिंचन शहरमनाच्या मशागतीसाठी आवश्यक आहे,’ असे उत्तर आले. पुण्यामध्ये प्रायोगिक रंगभूमीवर खूप वेगवेगळे प्रयोग होत असतात. ‘समथिंग लाइक ट्रुथ’ हा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले लिखित आणि अभिनेत्री पर्ण पेठे दिग्दर्शित प्रयोगही असाच आगळावेगळा. पर्णचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न. हे रुढार्थाने नाटक नाही; ती स्वगतशृंखला आहे. चार स्त्रिया त्यांच्या चार वेगवेगळ्या वर्तमानांबाबत बोलताना त्यांची सत्याशी चाललेली झटापट त्यांच्या स्वगतांमधून व्यक्त करतात. हे सगळे प्रथमपुरुषी असले, तरी त्यातील कुठलेच स्वगत एका घटनेपुरते, एका व्यक्तिरेखेपुरते उरत नाही, तर अगदी देश, काळाच्याही सीमा ओलांडून सार्वत्रिक आणि सार्वकालिक होऊन जाते. सध्याच्या सत्योत्तर काळात – जेथे असत्याच्या पायऱ्यांवरच तथाकथित ‘सत्य’ उभे राहते – ही अशी टोचणी आवश्यक आहे, म्हणून हा प्रयोग महत्त्वाचा. पहिल्या स्वगतात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या काळातील फ्रान्समधील मारी नावाची सफाई कर्मचारी महिला तिला फ्रेंच लष्कराने दिलेल्या ‘कामगिरी’बाबत बोलते. जर्मन दूतावासाच्या कार्यालयात सफाई करताना मिळतील ते कागद तिला आणून द्यायला सांगितले जाते. ते ती करते आणि त्यावरून जर्मनांसाठी कथित हेरगिरी करणारा कॅप्टन आल्फ्रेड ड्रेफस पकडला जातो. त्याला पकडून आणलेला पाहताना तिला तो ‘तसा’ वाटत नाही आणि अनेक प्रश्न छळू लागतात. दुसऱ्या स्वगतात याच आल्फ्रेडची प्रियतमा ल्युसी, आल्फ्रेडच्या निर्दोषत्वाबाबत बोलत राहते आणि त्या दरम्यान तिला फ्रेंच राज्यक्रांतीच्या उत्तरकाळात मोडकळीस येत चाललेल्या स्वातंत्र्य, समतेच्या कल्पनांचे दारुण चित्र दिसू लागते. तिसरा बंध थेट २००२ च्या भारतातील एका धार्मिक दंगलीकडे घेऊन जातो. या स्वगतातील, एका बेकरीत झालेल्या हत्याकांडाची आणि स्वत:वरील अत्याचाराची एकमेव साक्षीदार असलेली जमिरा, सत्य सांगितल्याच्या ‘परिणामी’, असत्य साक्ष दिल्याची कबुली द्यायला भाग पडून खऱ्या गुन्हेगारांऐवजी स्वत:च आपल्या ‘असत्या’ची शिक्षा भोगते आहे. तर, अखेरच्या स्वगतातील महिला पत्रकार, दुर्व्यवस्थेशी लढणारे प्रसिद्ध श्रीलंकन पत्रकार लसिंथा विक्रमतुंगे यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील सत्याची भूमिका शोधते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्याचे असे अनेकविध पापुद्रे उलगडत हा प्रयोग शब्द, कायिक हालचाली, गीत-संगीत यांतून साकारत जातो. अमुक एक म्हणजेच सत्य असे सांगणारा हा प्रयोग नाही, तर सत्यासारखे जे काही आहे, ते काय आहे, याचा प्रेक्षक म्हणून, नागरिक म्हणून तुम्हीही एकदा शांतपणे विचार करा, असे सांगणारा दृश्य आविष्कार आहे. म्हणूनच, पुण्यामध्ये ज्या प्रकारचे प्रायोगिक नाटक होते, त्यात हाही आणखी एक वेगळा प्रयोग, इतकाच फक्त तो नाही. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, गीतलेखन, पात्रांच्या हालचालींची रचना अशा बहुतेक सर्व महत्त्वाच्या विभागांच्या संकल्पक आणि योजक या स्त्रिया आहेत. हे काही विशेष मुद्दाम ठरवून (जाहिरात वगैरे करता येईल म्हणून) केले आहे, असे वाटत नाही आणि तरी ते परिणामात अत्यंत प्रभावी आहे. किंबहुना स्त्री जाणिवेतून सत्याकडे पाहण्याचे हे दृष्टिकोन अधिक संवेदनशील आणि प्रसंगी तीव्र आहेत.

हा प्रयोग पुण्यात होण्याचे महत्त्व काय, त्याविषयी थोडे. हा प्रयोग प्रेक्षकसमीप, पण चांगली उंची-खोली असलेल्या जागेत करायचा प्रयोग आहे. असे अवकाश आज पुण्यातील रंगधर्मींनी तयार केले आहे, हे जाणकार प्रेक्षकांचे भाग्य. प्रायोगिक नाटकांसाठीच तयार झालेले सुदर्शन रंगमंच, द बॉक्स, श्रीराम लागू रंग अवकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह ही त्याची काही उदाहरणे. शिवाय, विविध कारणांसाठी पुण्यात स्थलांतरित झालेल्या समुहांमुळे पुण्यात ज्या प्रकारचा बहुभाषिक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे, त्याच्यासाठी हा हिंदी आणि इंग्रजीतील प्रयोग दूरचा वाटणार नाही, हेही खरेच. ज्या पुण्याने नव्या प्रयोगांना कायम दाद दिली, तेथे हे होत आहे, हेही चांगलेच. मी ज्या दिवशी हा प्रयोग पाहिला, त्या सायंकाळी सलग दोन प्रयोग असूनही दोन्ही वेळांना प्रेक्षागृह पूर्ण भरले होते. नवे दिले, तर ते लोकांना हवे आहे, याचेही हे सुचिन्ह.

आता या जोडीने जाता जाता वर उल्लेख केला, त्या टोचणीविषयी. ज्या पुण्याने एके काळी देशाच्या वैचारिक घुसळणीत मोठी भूमिका बजावली, ते पुणे आताशा थोडे सुस्त होताना दिसते. थोडी मरगळ आली असेल, तरी ठीक, ती झटकता येते. या शहराला बधीरपणा येत चालला आहे, असे वाटावे, अशी स्थिती एरवी रस्तोरस्ती वावरताना दिसते. कर्कशतेसाठी अलीकडे वाहतूक कोंडीपासून वाढदिवसापर्यंत कोणतेही कारण पुरणाऱ्या पुण्यात प्रश्न विचारणे कमी आणि ते निर्माण करणारे अधिक झाले आहेत. अशा या बधीर संवेदनेला ‘सत्यासारखे काही तरी’ दाखविणे आवश्यक आहे. कारण, आपण आपली सत्ये विसरलो, तर वर्तमानाचा भूतकाळ होताना, त्याचे कोणतेच टोक भविष्याच्या हाती लागत नाही. म्हणूनच, हे ‘सत्य’ दाखविण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्याबद्दल पर्ण पेठे, शिल्पा बल्लाळ, अश्विनी गिरी, दुशा, कल्याणी मुळ्ये, शर्वरी देशपांडे, आभा सौमित्र, मैत्रियी जोशी, शीतल साठे आणि या सगळ्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सर्व मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या हितचिंतकांचे मनापासून आभार.

siddharth.kelkar@expressindia.com