राजीव गांधी आयटी पार्कच्या फेज तीनमधील गवारवाडीमध्ये स्मशानभूमीसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ७ जुलैला परमेश्वर गवारे यांचा अंत्यविधी भररस्त्यात पार पडला होता. हे वास्तव ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने सर्वात आधी सर्वांसमोर आणल्यानंतर ‘एमआयडीसी’ने सहा गुंठे जागा माण ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्याची माहिती माणगावच्या सरपंच स्मिता सागर भोसले यांनी दिली. या जागेत सध्या जेसीबीने साफ सफाईचे काम सुरू असून, स्मशानभूमीचा सर्व खर्च ग्रामपंचायत करणार आहे.  आयटी कंपनी आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांमुळे पुण्यातील हिंजवडी परिसर गजबजलेला असतो. मात्र याच गजबजलेल्या रस्त्यावर एक अंत्यविधी पार पडला होता. परमेश्वर गवारे या ३३ वर्षीय माणसाचा मृत्यू झाला. मात्र त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने हा अंत्यविधी रस्त्यावरच करण्यात आला.

२००७ मध्येच या ठिकाणी स्मशानभूमीची जागा विकसित करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र १० वर्षांमध्ये स्मशानभूमी उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे अशाच प्रकारे मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर येते होती. हिंजवडीपासून माणगावची स्मशाभूमी ६ किलोमीटर अंतरावर आहे. तर भोईरवाडीची स्मशानभूमी ४ किलोमीटर लांब आहे. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह इतक्या लांब घेऊन जाणे शक्य नसल्याने लोक रस्त्यावरच अंत्यसंस्कार उरकून घेतात. ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने दिलेल्या बातमीमुळे गवारवाडीच्या नागरिकांची समस्या दूर होणार आहे. आत्तापर्यंत सुमारे ४० ते ४५ मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाने आता ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

स्मशानभूमी नसल्याने हिंजवडीत रस्त्यावरच अंत्यसंस्कार, कधी सुटणार प्रश्न?

Story img Loader