वेगाच्या नशेमुळे सामान्यांचा बळी जाण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अशा प्रकारच्या अपघातांत मुख्यत्वे दुचाकीस्वार किंवा पादचाऱ्यांचा बळी जातो. मद्यपी वाहनचालकांची तपासणी, तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईत सातत्य ठेवल्यास वेगाची नशा उतरण्यास वेळ लागणार नाही.
गेल्या आठवड्यात शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या ‘हिट अँड रन’ घटनांत तीन पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात सकाळी फिरायला निघालेले सुजितकुमार सिंह (वय ४९, रा. उंड्री) यांचा १ एप्रिल रोजी भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत अरुण जोशी (वय ६०, रा. विवेकश्री बिल्डिंग, राजेंद्रनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटनाही नुकतीच घडली. नगर रस्त्यावरील येरवडा परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या अमिना करीम मेघानी (वय ६०, रा. विलमिन सोसायटी, आगाखान पॅलेससमोर, शास्त्रीनगर, येरवडा) यांचाही भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. या तीन घटनांखेरीज कोथरूड भागातील पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या कठड्याला आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची एक घटना घडली. तर, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर मित्राच्या पार्टीवरून मध्यरात्री घरी निघालेल्या मोटारचालक महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली. भरधाव मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगर कपारीवर आदळून हा अपघात घडला.
या सर्व अपघातांमागे अतिवेग कारणीभूत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. शहरातील रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे भान प्रत्येकच वाहनचालकाने ठेवायला हवे. अलीकडच्या काळात ३०० आणि ५०० सीसीच्या दुचाकी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून मोठ्याने आवाज करत सुसाट जाताना दिसतात. मोटारींबाबतही हीच तऱ्हा. अशी भरधाव वाहने पादचारी किंवा इतर वाहनांच्या शेजारून गेली, तरी घाबरून धडकी भरते. त्या भीतीपोटीही अनेकांचा तोल जाऊन अपघात व्हायची शक्यता असते. अतिवेग हे साहस नसून बेजबाबदारपणा आहे. वेगामुळे दुसऱ्याचा आणि स्वत:चाही जीव आपण पणाला लावतो आहोत, याचे भान सुटल्यासारखे वाहनचालक गाड्या चालवतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर पोलिसांनी वचक बसवायलाच हवा.
यातही आता ‘हिट अँड रन’ प्रकारातील वाहनचालकांची मानसिकता वेगळी असते. गुन्हा घडल्यानंतर मोटारचालक किंवा ट्रकचालक पसार होतात. मुळात अपघात घडल्यास गंभीर जखमी अवस्थेतील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अपघातानंतर मदत न करता घटनास्थळावरून पसार होणे हा मोठा गुन्हा आहे. उंड्री परिसरातील अपघातात पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेल्या मोटारचालकाने तर अपघातानंतर वाहन क्रमांकाची पाटी काढून मोटार औताडेवाडी परिसरातील डोंगराजवळ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले होते. अशाच प्रकारे गुन्हा लपविण्यासाठी घटनास्थळावरून पसार होणे, पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे, यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीनाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, त्यांची पत्नी शिवानी, ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह अन्य आरोपींना अटक होऊन अद्याप जामीन मिळालेला नाही. प्रत्येक गोष्ट पैशांच्या बळावर विकत घेता येत नाही, हे कल्याणीनगर अपघात प्रकरणातून सिद्ध झाले. कल्याणीनगर अपघात प्रकरणातून वाहनचालकांनी धडा घेणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन देणे कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव अनेक पालकांना नसते. अतिवेगामुळे त्यांच्याकडून गंभीर अपघात होतात. अशा अपघात प्रकरणात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर परवाना रद्द होताे, तसेच पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. छोटी चूकदेखील अंगलट येऊ शकते, याचे भान पालकांनीही ठेवणे गरजेचे आहे.
rahul.khaladkar@expressindia.com