ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ओझे आता जड झाले असून, त्याचा ताण पर्यायाने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर येत आहे. सर्वच सरकारी आरोग्य संस्थांनी ससूनवरील कामाचा बोजा वाटून घेतल्यास हे महाविद्यालय आदर्श पद्धतीने काम करू शकेल.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून सर्वोपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आरोग्य सेवा केंद्र आहे. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार परवडत नसल्याने ससूनचा रस्ता धरतात. यामुळे साहजिकच ससूनमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता मात्र, ससूनला हा वाढत्या रुग्णसंख्येचा भार पेलवत नसल्याचे चित्र आहे. याचा एकंदरीत परिणाम बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर होत आहे.
हेही वाचा >>>डेक्कन कॉलेजची ‘विरासत’ आता ऑनलाइन; विद्यार्थी, अभ्यासकांना मोठी संधी
वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय आणि तिथे कार्यरत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांचे प्रमुख कर्तव्य हे वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिकविणे असते. त्यानंतर त्यांच्यावर संशोधनात्मक काम करण्याची जबाबदारी असते. या दोन्ही गोष्टींनंतर रुग्णसेवेचा क्रमांक लागतो. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाच्या कार्यपद्धतीच्या अगदी उलट प्रकार ससूनमध्ये सुरू आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार खुद्द येथील प्राध्यापक करीत आहेत.
राज्यातील मोजक्या जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून बाहेर पडलेले अनेक डॉक्टर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकावत आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय सेवेमध्येही येथील डॉक्टरांनी छाप पाडली आहे. असे असताना मागील काही काळापासून ससूनमध्ये सुरू असलेल्या प्रकारांमुळे या महाविद्यालयाची अप्रतिष्ठा होत आहे. रुग्णसेवेबाबतच्या अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा तक्रारी आल्यानंतर प्रत्येक वेळी रुग्णालयावर असलेला अतिताण प्रकर्षाने समोर येत आहे. ससून रुग्णालयाची क्षमता सुमारे १ हजार २९७ आहे. प्रत्यक्षात रुग्णालयात सुमारे १ हजार ८०० रुग्ण दाखल असतात. यामुळे येथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर ताण येतो.
हेही वाचा >>>शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणुकीच्या बहाण्याने तीन घटनांमध्ये ९० लाखांचा ऑनलाइन गंडा
ससूनवर केवळ रुग्णसेवेचाच भार नसून, इतर सरकारी कामांचे ओझेही आहे. अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची सुविधा ससून रुग्णालयात आहे. पुणे जिल्ह्यातील इतर सरकारी रुग्णालयांत ही सुविधा असली, तरी ससूनमध्ये यासाठी सर्वाधिक जण जातात. याच वेळी शहरात शवविच्छेदनाची सुविधा इतर सरकारी रुग्णालयांत उपलब्ध असतानाही बहुतांश शवविच्छेदने ससूनमध्येच होतात. ससूनमध्ये प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील सुमारे पाचशे पदे रिक्त आहेत. एवढी पदे रिक्त असून, दिवसेंदिवस कामाजा बोजा वाढत आहे.
ससूनवरील बोजा कमी करण्यासाठी जिल्ह्यातील इतर सरकारी रुग्णालयांमध्ये कामाचे योग्य वाटप प्रशासकीय पातळीवर होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर इच्छाशक्ती दाखवून त्या दृष्टीने पावले उचलावी लागतील. केवळ रुग्णसेवाच नव्हे, इतर सर्व कामांचा बोजा सर्व रुग्णालयांनी वाटून घेतल्यास ससूनवरील अतिरिक्त ताण कमी होऊन अधिक चांगल्या पद्धतीने ते कार्य करू लागेल. यातूनच बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयही योग्य पद्धतीने विद्यादानासह संशोधनाचे कार्य करून आपला झेंडा फडकावू शकेल.
sanjay.jadhav@expressindia.com