पुणे : शिवपुत्र कोमकली या नावाच्या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षी स्वरांच्या अद्भुतरम्य विश्वात जो प्रवेश केला, तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. स्वरांच्या प्रांगणात आपल्या प्रतिभेने चैतन्याचे मळे फुलवणारा हा कलावंत वयाच्या सातव्या वर्षीच कुमार गंधर्व या पदवीने सन्मानित झाला. या कलावंताने लहान वयातच साऱ्या देशातील रसिकांचे लक्ष वेधले आणि नंतरच्या आयुष्यात आपल्या असामान्य कल्पनाशक्तीने साऱ्यांनाच अचंबित केले. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘सुनता है गुरु ग्यानी’ या खास विशेषांकाचे आयोजन केले असून, त्याचे प्रकाशन ३० जून रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका आजपासून उपलब्ध होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाशनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कुमारजींचे नातू भुवनेश कोमकली आणि ज्येष्ठ गायिका श्रीमती आरती अंकलीकर हे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम, शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी सहाला टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.

कुमारजींच्या संगीतविश्वाचा साक्षात्कार त्यांनी रचलेल्या बंदिशींमधून जसा होतो, तसाच त्यांनी सादर केलेल्या विशिष्ट विषयांना वाहिलेल्या विशेष कार्यक्रमांमधूनही होतो. त्याची झलक या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहे. कलावंताला सर्जनाची प्रक्रिया समजावून सांगता येतेच असे नाही. कुमार गंधर्व मात्र त्याला अपवाद ठरले. संगीतविद्येचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती आणि अभ्यासाला अभिजाततेचा दर्जा मिळवून देत त्याचे सादरीकरण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. त्यामुळेच कलावंत आणि विचारवंत अशा दोन्ही प्रांतांतील त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. ‘सुनता है गुरु ग्यानी’ या विशेषांकात कुमारजींच्या या वैशिष्टय़ांची उकल करणारे लेखन समाविष्ट आहेच, त्याशिवाय त्यांच्या खास शैलीचे रसग्रहण करणाऱ्या लेखांचाही समावेश आहे. त्यामुळे संगीतरसिकांसाठी संग्राह्य ठरणाऱ्या या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळय़ात रसिकांना स्वरशब्दांची मेजवानीच मिळणार आहे.

‘सुनता है गुरु ग्यानी’ विशेषांक प्रकाशन

’शुक्रवार, दि. ३० जून

’स्थळ : टिळक स्मारक मंदिर

’वेळ : सायंकाळी सहा वाजता.

प्रवेशिका येथे.. या सांगीतिक कार्यक्रमाच्या प्रवेशिका आज, रविवार २५ जूनपासून सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे उपलब्ध असतील. भुवनेश कोमकली, आरती अंकलीकर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta special event in pune on the occasion of kumar gandharvas birth centenary zws