आठवडय़ाची मुलाखत : जोआकिम काव्‍‌र्हालो भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेतील रौप्यपदक विजेतेपदासारखेच आहे असे मला वाटते, मात्र भारतीय खेळाडूंची खरी कसोटी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतच दिसून येणार आहे हे आपल्या खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे, असे माजी ऑलिम्पिकपटू व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जोआकिम काव्‍‌र्हालो यांनी सांगितले. लंडन येथे नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स

स्पर्धेत भारताला अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीबाबत काव्‍‌र्हालो यांनी समाधान व्यक्त केले. काव्‍‌र्हालो यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भारतीय खेळाडू तयार झाले आहेत. भारतीय संघाच्या वाटचालीविषयी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

* चॅम्पियन्स स्पर्धेतील कामगिरीबाबत काय सांगाल?

बऱ्याच वर्षांनी आपण या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आपल्यापुढे ऑस्ट्रेलियासारखा मातब्बर प्रतिस्पर्धी असताना आपले खेळाडू आत्मविश्वासाने खेळले. या सामन्यात आपण सर्व पेनल्टी कॉर्नर वाचवले तसेच पेनल्टी स्ट्रोकवरचा गोलही रोखला. ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. आजपर्यंत कांगारूंविरुद्ध आपण मोठय़ा फरकाने पराभूत झालो आहोत. त्या तुलनेत हे यश खूपच अपेक्षा उंचावणारे आहे.

* पेनल्टी शूटआऊटवरील कामगिरीबाबत समाधानी आहात काय?

खरे तर पेनल्टी स्ट्रोक ही आपली हुकमत मानली जाते. एक वेळ पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करताना आपले खेळाडू अजूनही कमकुवत आहेत. तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मात्र आपल्या खेळाडूंनी पेनल्टी स्ट्रोकच्या संधी वाया घालविल्या याचे मला खूप वाईट वाटते. अशा सुवर्णसंधी फारच क्वचित येत असतात. त्या वेळी झालेल्या गोंधळाबाबत मी मत व्यक्त करणार नाही. मात्र गोल करताना काय किंवा गोल मारताना आपले नाणे खणखणीतच राहील असे आपण कौशल्य दाखविले पाहिजे.

* या स्पर्धेतील कामगिरीवरून ऑलिम्पिकमध्ये आपल्या संघाला पदक मिळविता येईल असे तुम्हाला वाटते का?

चॅम्पियन्स स्पर्धेत आपण जर्मनीला बरोबरीत रोखले, इंग्लंडला हरविले. ऑस्ट्रेलियास कडवी लढत दिली हे लक्षात घेता आपण पदकाच्या जवळ चाललो आहोत. मात्र चॅम्पियन्स स्पर्धेतील कामगिरीवरून आपण हुरळून जाता कामा नये. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही. तेथील आव्हाने खूपच वेगळी असतात. तेथे सहभागी होणारा प्रत्येक संघ खूप मेहनत करीत तेथे पोहोचला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

* भारतीय संघात कोणत्या सुधारणांची गरज आहे?

भारतीय खेळाडूंच्या कौशल्यात सातत्य आणण्याची आवश्यकता आहे. एकमेकांकडे चेंडू देताना तो जास्त लांब देण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे चेंडूवरील नियंत्रण आपल्याच संघाकडे राहू शकते. आक्रमक खेळ जरूर करावा, मात्र फाऊल होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अनेक परदेशी संघातील खेळाडू भारतीय खेळाडूंच्या पायावर चेंडू कसा टाकता येईल व पेनल्टी कॉर्नर कसा मिळेल हा दृष्टिकोन ठेवीत खेळत असतात. आपल्या खेळाडूंनी असे प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी हादेखील खेळाच्या डावपेचांचा भाग असतो.

* भारतीय युवा खेळाडूंविषयी काय सांगता येईल?

भारतीय युवा खेळाडूंनी खूपच प्रशंसात्मक कामगिरी केली आहे. हे खेळाडू म्हणजे भावी ऑलिम्पियन्स आहेत हे लक्षात ठेवून संघटकांनी त्यांच्यावर आणखी मेहनत घेतली पाहिजे. या खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धात्मक अनुभव कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या खेळात कशी परिपक्वता येईल, यावर प्राधान्य दिले पाहिजे.

* देशातील एकूण हॉकीविषयी काय सांगता येईल?

भारतीय संघाची कामगिरी प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या खेळाविषयी लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हायला लागला आहे. त्याचा फायदा संघटकांनी घेतला पाहिजे. या खेळास पूर्वीसारखे वैभवशाली दिवस कसे प्राप्त होतील यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.