‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची उत्सुकता नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांमध्ये शिगेला पोहोचली आहेच शिवाय मान्यवरांमध्येही या स्पर्धेचा बोलबाला आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना  http://www.loksatta. com/lokankika या लोकांकिकाच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अ‍ॅपवर तरुणाईच्या हिट्सची संख्याही वाढली आहे.
‘लोकांकिका’ स्पर्धेची राज्यभरातील केंद्रे, सविस्तर वेळापत्रक, पारितोषिके, नियम व अटी, बातम्या, प्रायोजक या सर्व गोष्टी संकेतस्थळावर अतिशय सोप्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील कुठल्याही भागातील महाविद्यालयांना ‘लोकांकिका’ स्पर्धेचे प्रवेश अर्ज डाऊनलोड करण्याची ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळेच, ‘लोकांकिका’ सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली असून स्पर्धेसंदर्भातील छायाचित्रे आणि व्हिडीओ गॅलरीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व ‘झी मराठी’ वाहिनीकडे असेल.
रंगभूमी, मालिका, चित्रपटांतील आघाडीच्या कलाकारांनीही या उपक्रमाचे प्रचंड कौतुक केले आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री मनवा नाईक यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यासारख्या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात पाय रोवू पाहणाऱ्यांसाठी एकांकिका स्पर्धाचे महत्त्व स्वानुभवावरून सांगत तरुण रंगकर्मीना या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छाही दिल्या आहेत. एकांकिका अभिनयाचा अमीट संस्कार घडविते, असे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी म्हटले आहे. रंगभूमीशी संबंधित विविध भागांचे प्रशिक्षणही अशा स्पर्धातून साधते, असे अभिनेत्री मनवा नाईकने म्हटले आहे. तर एकांकिकांमधून सर्जनशीलतेला मोठाच वाव मिळतो, असे बुजूर्ग अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी नमूद केले आहे.
मान्यवरांच्या शुभेच्छांचे सर्व व्हीडिओ indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika/videogallery येथे पाहता येतील.

एकांकिकेच्या माध्यमातून होणारे संस्कार शेवटपर्यंत कामी येतात. त्यामुळे प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञावर mu04हे संस्कार होणं खूप गरजेचं आहे. नाटकांमधून काम केल्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि तो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी कामाला येतो. तसेच एक टीम म्हणून कसं काम करायचं हेसुद्धा एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून शिकता येतं. मीसुद्धा माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही एकांकिका स्पर्धामधूनच केली आहे.
– सतीश राजवाडे, दिग्दर्शक

ज्या तरुण-तरुणींना मनोरंजनाच्या क्षेत्रात आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एकांकिका स्पर्धा हे mu05खूप चांगलं व्यासपीठ आहे. फक्त अभिनय नाही तर दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, संगीत याबद्दलही तुम्हाला एकांकिकांमधून शिकता येतं. मुंबई आणि महाराष्ट्रात एवढी मोठी चळवळ कार्यरत आहे, ही आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक रंगभूमी, मालिका आणि चित्रपट यांमधील कलाकार आणि  तंत्रज्ञांचेही ह्य़ा स्पर्धांकडे खूप गांभीर्याने लक्ष असते.
– मनवा नाईक, अभिनेत्री

काही महत्त्वाचे नियम
*स्पर्धेसंदर्भातील काही नियमांत बदल झाले आहेत. एकांकिका स्पर्धेसाठी १ जानेवारी २०१४ आणि त्यापुढील संहितांचे प्रयोग सादर करता येतील.
*प्रवेश अर्जासोबत एकांकिकाच्या दोन प्रती, एकांकिका १ जानेवारी २०१४ किंवा त्यापुढील असल्याचे रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आणि लेखकाचे हमीपत्र जोडणे आवश्यक.
*स्पर्धेच्या अर्जावर महाविद्यालयाच्या प्राचार्याची स्वाक्षरी, शिक्का अनिवार्य. स्पर्धेत रंगमंचावर काम करणारे विद्यार्थी हे आजी विद्यार्थी असणे आवश्यक.
*कोणाही स्पर्धक (दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ) कलावंतास एकाच एकांकिकेसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. मात्र, एकच लेखक एकापेक्षा अधिक महाविद्यालयांसाठी एकांकिका लिहू शकतो. (अधिक नियम लोकांकिकेच्या संकेतस्थळावर)

एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून नवीन लेखक, तंत्रज्ञ, कलाकार आणि दिग्दर्शक घडत असतात. ज्या तरुणांना काही नवीन प्रयोग करून पाहायचे असतील त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी व्यासपीठ आहे. एकांकिका हा स्वतंत्र नाटय़प्रकार आहे. मी स्वत: एकांकिका स्पर्धामध्ये काम केलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांच्या सर्जनशिलतेला वाव मिळेल, असं मला वाटतं.
– दिलीप प्रभावळकर, अभिनेता

Story img Loader