जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्रीसाठी आली होती. ४८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्याकडून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहेत. नितीन शिवाजी लेहणे, संदीपान गुट्टे आणि गणेश सुरेश दराडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
हेही वाचा – राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
हेही वाचा – राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांनावर पोलिसांची करडी नजर आहे. नशा मुक्तीच्या संदर्भात अभियान देखील लोणावळा पोलीस चालवत आहेत. लोणावळा परिसरातील कार्ला येथे जुना पुणे- मुंबई महामार्गावर काही जण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. पोलिसांचे एक पथक त्या रात्री गस्त घालत होते. सापळा लावून ते हॉटेल तेजस येथे थांबले. पहाटे तीन च्या सुमारास काही संशयित चारचाकी गाडीतून आले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले. तिघे जण उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर त्यांच्या चारचाकी गाडीची पंचासमक्ष पोलिसांनी झडती घेतली. गाडीच्या डिक्कीत दोन गोणीमध्ये ४८ किलो गांजा मिळाला. ४८ किलो गांजा आणि गाडीसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तीनही आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ऍक्ट १९८५ च्या कलमानुसार ८ (क), २० (ब) आणि (क), २९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.