लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. यामुळे भुशी धरणावर काही प्रमाणात गर्दी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. २४ तासात तब्बल १६६ मिमी पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. 

लोणावळा पर्यटनस्थळ हे अवघ्या भारतात प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात तर भुशी धरण हे पर्यटकांचं केंद्रबिंदू असतं, तिथं दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. जून महिन्यात पाऊस झाला नाही, मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावली असून वर्षा विहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी दहा च्या सुमारास भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर अवघ्या काही तासात नागरीकांची तिथे काही प्रमाणात गर्दी झाली आहे. 

पाहा व्हिडीओ –

दोन वर्षे करोनामुळे पर्यटकांना मनाप्रमाणे वर्षा विहाराचा आनंद घेता आला नाही. यावर्षी करोना आटोक्यात असून आता कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं व्यवसायिक यांच्यासह पर्यटक आनंदित आहेत. पुढील शनिवार, रविवार रोजी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्याची शक्यता लोणावळा पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे. 

Story img Loader