पुणे : मुंबई विभागातील लोणावळा स्थानकावर वाहतूक ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे २७ ते २९ जून या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या काही लोकल २७ ते २७ जून या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरुन लोणावळ्यासाठी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच, लोणावळ्यावरून पुण्याला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी लोकल आणि लोणावळ्यावरून शिवाजीनगरला दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.रामदास भिसे यांनी दिली.
प्रवाशांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय
मध्य रेल्वेने सामान्य श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निःशुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि मिरज स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, मिरज स्थानकांवर प्रवाशांना आता निःशुल्क शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था मिळत आहे. सातारा आणि मिरज स्थानकावर ही सुविधा रेल्वे विभागाकडून राबवण्यात आली आहे. पुणे स्थानकावर माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत लायगुडे यांनी ही सुविधा दिली आहे. कोल्हापूर स्थानकावर कोल्हापूर राजस्थानी महिला मंडळाने पाणपोईची सुविधा दिली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या संयोजनाद्वारे रेल्वे विभागाकडून ही सुविधा सुरू झाली आहे.