लोणावळ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पावसाने हजेरी लावली आहे. या मोसमातील सर्वाधिक पाऊस गेल्या ४८ तासांत कोसळला आहे. गेल्या २४ तासांत लोणावळ्यामध्ये २२० मिलिमीटर पाऊस कोसळला असून ४८ तासांत तब्बल ४३४ मिनिटं पावसाची नोंद झाली आहे. तरी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २५९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा मात्र केवळ १७४४ मिलिमीटर इतका पाऊस कोसळला आहे. लोणावळ्यामध्ये सलग दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या मोसमातील विक्रमी पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे भुशी धरण हेदेखील ओसंडून वाहत आहे.
हेही वाचा – कोथरुडमध्ये दोन तरुणांना अटक; देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय
भुशी धरणाच्या आजूबाजूला पर्यटकांची मोठी गर्दी नेहमी पाहायला मिळते. छोटे-मोठे धबधबे सह्याद्रीच्या डोंगरावरून खाली पडत असल्याचं मनमोहक चित्र बघायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.