लोणावळा : जीव धोक्यात घालून सहारा पूल परिसरातील धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या २६ पर्यटकांविरुद्ध लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भुशी धरण परिसरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. वर्षाविहारासाठी पुणे-मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक येतात. अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करतात. धबधब्याच्या परिसरात मोबाइल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्र काढतात.

हेही वाचा >>> पिंपरी : चिंचवडमध्ये मोटार- स्कूलबसची समोरासमोर धडक; विद्यार्थी सुखरूप

धबधब्याच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हुल्लडबाजी करून जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांविरुद्ध कारवाईचा आदेश पोलिसांना दिला आहे. लोणावळा, खंडाळा परिसरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करून लोणावळ्यातील सहारा पुलासमोरील धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या चार वेगवेगळ्या गटांतील २६ पर्यटक तरुणांविरुद्ध लोणावळा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. प्रतिबंधात्मक आदेश भंग केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम २२३ अन्वये रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेले पर्यटक तरुण मुंबई, मावळ, मुळशी, शिक्रापूर, शिरूर, चाकण, खेड, पुणे शहर परिसरातील आहेत. याबाबत पोलीस नाईक हनुमंत शिंदे आणि रईस मुलाणी यांनी स्वतंत्र फिर्याद दाखल केल्या असून, पोलीस निरीक्षक सुहास जगताप तपास करत आहेत.