पुणे : जात व्यवस्था आणि सामाजिक न्यायाबाबतची चर्चा अधिक व्यापक करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज येथील एसओएएस आंबेडकर सोसायटीने पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने २५ ते २७ एप्रिल या कालावधीत ‘लंडन अँटी कास्ट फिल्म फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.

एसओएएस आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष आणि संशोधक अभिषेक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सओएएस आंबेडकर सोसायटी ही लंडनस्थित विद्यार्थ्यांची संस्था जात आणि विषमता या विषयी भारत आणि जागतिक स्तरावर सर्जनशील गंभीर संवादाद्वारे नवा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जातीय व्यवस्थेने प्रभावित झालेल्या वंचित समुदायांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्यासाठी, उदारमतवादी राजकारणाविषयी नव्याने विचार करण्यासाठी ही संस्था प्रेरित करते.

महोत्सवाच्या आयोजनासाठी एसओएएस साऊथ एशिया इन्स्टिट्यूट, एसएसई आंबेडकर सोसायटी, एसएफआय युके, इंडिया लेबर सॉलिडॅरिटी यांचे सहकार्य लाभले आहे. चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करून जातनिर्मूलनाच्या लढ्याला वाचा फोडणे, डॉ. आंबेडकर यांच्या वारशाचा गौरव करणे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

‘जात व्यवस्थेचा गंभीर विषय युकेमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा महोत्सव हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रभावी चित्रपटांच्या माध्यमातून जातीय भेदभावाची ऐतिहासिक आणि सद्य:स्थिती दाखवण्याचा, समानता आणि सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,’ असे भोसले यांनी नमूद केले.

महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट

महोत्सवात एकूण पाच चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, पा. रणजित दिग्दर्शित ‘काला’, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’, आनंद पटवर्धन दिग्दर्शित ‘जय भीम कॉम्रेड’ या चित्रपटांचा समावेश आहे.