पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कात्रज ते कोंढवा या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न हळूहळू सुटत आहे. या रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे काही वर्षांपासून हा रस्ता वाहनचालक तसेच या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी त्रासदायक बनला आहे. सकाळी आणि संध्याकाळी या भागात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रश्न विधानसभेपासून ते लोकसभेच्या सभागृहात गाजला आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे चर्चेत असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या कामाला अधिक वेगाने गती देण्यासाठी पालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्याच्या कामासाठी सात जागामालकांनी आपले प्रस्ताव पालिकेकडे सादर केले असून, याची तपासणी करून ही जागा तातडीने ताब्यात घेण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
हेही वाचा…पवनानगर बोट दुर्घटना, तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालक , बोट मालकांवर गुन्हा दाखल
या रस्त्यावर पालिकेच्या वतीने उड्ढाणपूल बांधला जात आहे. यासाठी आवश्यक असलेल्या २८० मीटर रस्त्याचे तातडीने भूसंपादन करण्यासाठी पालिकेने प्राधान्य दिले आहे. या पुलासाठी आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने प्रस्ताव सादर केल्यास रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला दिले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी पालिकेला मदत करण्याचा शब्द दिला आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा देण्याची तयारी जागामालकांनी दाखविल्यानंतर त्यावर कार्यवाही करत तातडीने जागा ताब्यात घेण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली आहे. मात्र, भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कोंढव्यातील खडी मशिन चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण गेल्या वर्षीपासून सुरू आहे.
हेही वाचा…महापालिकेने वाजविला बँड अन् तिजोरीत आली इतकी रक्कम !
या रस्त्यावरील काही भागात समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर), तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्यात केले जात आहे. रस्ता तयार करण्यासाठी सात जागा मालकांनी तयारी दाखविली असून त्याचे प्रस्ताव पालिकेकडे देण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.