पुणे : वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता, दोन बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आज पुण्यात वेताळ टेकडी कृती समितीच्या वतीने भरपावसात वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौकदरम्यान लाँग मार्च काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकदेखील सहभागी झाले होते. पुण्याच फुप्फुस वाचवा, वेताळ टेकडी वाचवा! पुणे वाचवा! वेताळ टेकडीवरील प्रकल्प रद्द करा! वेताळ टेकडी तोडू नका, जीवन धोक्यात टाकू नका, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा – तापमानात वाढ आणि गारांसह पावसाची हजेरी; पुण्यात ‘यलो अलर्ट’
वेताळ टेकडीवर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होता कामा नये – वंदना चव्हाण
टेकड्या आणि सयकल ही पुणे शहराची ओळख होती. पण हळूहळू शहरात सायकल चालविण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर असंख्य नागरिक दररोज सकाळी आणि संध्याकाळी विविध टेकड्यांवर चालण्यासाठी जातात. त्यातील एक वेताळ टेकडी असून आता त्या ठिकाणी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. पुणे शहरातील टेकड्या हे फुफ्फुस असून त्या वाचवल्या पाहिजेत. त्यामुळे वेताळ टेकडीवर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होता कामा नये. या विरोधात आम्ही अखेरपर्यंत लढा देणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी मांडली.
हेही वाचा – पुणे : अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी
वेताळ टेकडीवरील प्रकल्पाला विरोध – मेधा कुलकर्णी
वेताळ टेकडी येथील बालभारती ते पौडफाटा रस्ता हा प्रस्तावित आहे. त्या रस्त्याचा १५ टक्केदेखील नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे प्रशासन एवढा का अट्टाहास करत आहे. पुणे शहरातील टेकड्या वाचल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत रस्ता आणि बोगद्याचा प्रकल्प होता कामा नये. हीच माझी भूमिका असल्याचे भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.