पुणे : राज्यात वाहनचालक आणि मालवाहतूकदारांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांना बसला आहे. पुण्यात मात्र, याउलट चित्र आहे. संपामुळे मंगळवारी शहरातील पेट्रोल पंपांवर सकाळी नेहमीपेक्षा जास्त वाहनांची गर्दी दिसून आली. मात्र, दुपानंतर ही गर्दी ओसरली.
हेही वाचा >>> चालकांचे आता चलो दिल्ली! ३ जानेवारीला जंतर मंतरवर आंदोलन
पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे आणि ग्रामीण भागात एकूण ९०० पेट्रोल पंप आहेत. वाहनचालक आणि मालवाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सोमवारी (ता.१) पसरली होती. त्यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा सोमवारी रात्री दिसून आल्या. या काही ठिकाणी एवढ्या मोठ्या होत्या की त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनने पंप बंद राहणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे वाहनचालकांना सुटकेचा नि:श्वास टाकला. पुण्यात मंगळवारी सकाळी पेट्रोल पंपांवर पुन्हा वाहनांची गर्दी काही प्रमाणात दिसून आली. पंप सुरूच राहिल्याने आणि पुरवठा सुरळीत असल्याने ही गर्दी दुपारनंतर ओसरण्यास सुरूवात झाली. पुण्यातील सुमारे ६० टक्के पेट्रोल पंपचालक हे स्वत:च्या टँकरमधून इंधनाची वाहतूकर करतात. यामुळे मालवाहतूकदारांच्या संपाचा फारसा फटका पुण्यात जाणवला नाही. पेट्रोल पंपांवर नेहमी तीन दिवस पुरेल एवढा साठा ठेवणे बंधनकारक असते. त्यामुळे पुरवठा कमी झाला तरी तो सुरळीत होईपर्यंत पंप सुरू राहू शकतात, अशी माहिती पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी दिली.