गुंतवणूक करण्याची क्षमता नसल्याने गरीब व्यक्ती उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे गरिबातील गरीब व्यक्तींची उत्पन्नक्षमता वाढवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे, असे मत नोबेलप्राप्त अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी मांडले.
गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतर्फे झालेल्या ऑनलाइन पदवी प्रदान कार्यक्रमावेळी काळे स्मृती व्याख्यानात डॉ. बॅनर्जी बोलत होते. संचालक डॉ. राजस परचुरे या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या १६६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यातील चार विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच संस्थेतील नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
डॉ. बॅनर्जी म्हणाले, की गरीब व्यक्ती क्षमता नसल्याने, कमी जोखमीचे काम करतात. त्यामुळे त्या गरीबच राहतात. दारिद्रय़ाच्या जाळ्यात अडकणाऱ्या व्यक्तींना पतपुरवठा प्रतिबंधित असतो. त्यांच्यावर नैसर्गिकदृष्टय़ा प्रतिकूल परिणाम होतो, दर्जात्मक पाठबळही मिळत नाही. गरीब व्यक्तींना सक्षम करण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून धोरण राबवण्याची आवश्यकता आहे.