भोसरीत राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे विरूध्द स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्यातील ‘गृहकलह’ असलेला सामना, चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांना त्यांच्याच एकेकाळच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दिलेले आव्हान आणि पिंपरीत आमदार अण्णा बनसोडे यांच्या एकतर्फी मार्गावर पक्षांतर्गत विरोधकांनी निर्माण केलेला ‘स्पीड ब्रेकर’ यासारख्या अनेक नाटय़मय घडामोडींमुळे तीनही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पुढे आले असून निकालाबाबत उत्कंठा आहे.
राष्ट्रवादीचा विशेषत: शरद पवार, अजित पवारांचा प्रभाव असलेल्या या भागातून निवडून आलेल्या तीनही आमदारांनी पुन्हा आपले भवितव्य आजमावून पाहिले आहे. गेल्यावेळी लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती. यंदा त्यांच्यामागे तगादा लावून उमेदवारी देण्यात आली. जगताप अपक्ष लढले आणि राष्ट्रवादीच्या पाठबळावर काँग्रेस विरोधात निवडून आले होते. यंदा ते भाजपच्या चिन्हावर लढले. गेल्यावेळीप्रमाणे यंदाही तीव्र विरोध असताना बनसोडे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. तीनही लढतींमध्ये आमदारांना कडवे आव्हान आहे. भोसरीत विलास लांडे, बंडखोर महेश लांडगे, शिवसेनेच्या सुलभा उबाळे, भाजपचे एकनाथ पवार, काँग्रेसचे हनुमंत भोसले, मनसेचे सचिन चिखले असा पंचरंगी सामना आहे. िपपरीत बनसोडे, शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे मनोज कांबळे, भाजप-रिपाइं आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, मनसेच्या अनिता सोनवणे िरगणात आहेत. चिंचवडमध्ये भाजपचे जगताप, शिवसेनेचे राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे, काँग्रेसचे कैलास कदम, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, अपक्ष मोरेश्वर भोंडवे असे सहा जण प्रमुख लढतीत आहे.

Story img Loader