पुणे : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाची तपासणी केली. तपासणीत बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.
योगेश शिवाजी ढेरे (वय ३५, रा. जनवाडी, विठ्ठल मंदिराजवळ, गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ढेरे याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात मोबाइलवरून संपर्क साधला. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्वरित मुंबई लोहमार्ग पोलिसांना ही माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाची तपासणी केली. तेव्हा बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही.
हेही वाचा – एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
हेही वाचा – पुणे, कोकण, विदर्भाला ‘ऑरेंज अॅलर्ट’; आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज
पोलीस नियंत्रण कक्षात ज्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता त्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात मोबाईल क्रमांक योगेश ढेरे वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ढेरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खैरनार तपास करत आहेत.