नगर रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून घरफोडी; तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.लोकेश पाटील (वय २२, रा. केसनंद, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाटील सराईत चोरटा आहे. त्याने नगर रस्ता भागातून दुचाकी चोरल्या होत्या; तसेच घरफोडीचा गुन्हा केला होता. तो केसनंद परिसरात थांबल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
हेही वाचा >>> पिंपरी : शहरांमध्ये ‘तंटामुक्त सोसायटी’ अभियान राबविण्याची आवश्यकता ; अजित पवार यांची सूचना
चौकशीत त्याने केलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. घरफोडीच्या गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला असून पाटील याच्याकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, विनायक साळवे आदींनी ही कारवाई केली.