शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क योजना आणू पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला सध्या अस्तित्वात असलेली पे अॅन्ड पार्कची व्यवस्था देखील योग्यप्रकारे चालवता येत नसल्याचे उघड झाले आहे. महापालिकेशेजारच्या वाहनतळांसह अनेक वाहनतळांवर नागरिकांची लूट होत असल्याची तक्रार सोमवारी आयुक्तांकडे करण्यात आली.
महापालिकेतर्फे शहरात अनेक ठिकाणी वाहनतळांचे ठेके देण्यात आले आहेत. मात्र, त्यातील बहुतेक ठेकेदारांनी दरासंबंधीचे फलक लावलेले नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बनावट पावत्या छापून त्या नागरिकांना दिल्या जातात अशाही तक्रारी आहेत. वास्तविक, वाहनचालकांना दिसेल अशा पद्धतीने दरपत्रकाचा फलक ठळकपणे लावावा अशी निविदेतील अट असतानाही या अटीचे सर्रास उल्लंघन होत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचने सोमवारी आयुक्तांकडे केली.
बालगंधर्व रंगमंदिरातील ठेकेदाराकडून ज्या पावत्या वाहनचालकांना दिल्या जातात, त्या पावत्यांवर दराचा आकडा हाताने लिहिला जातो. तसेच दराचा उल्लेख सोडून अन्य सर्व माहिती पावतीवर छापण्यात आली आहे. दोन ते पाच तसेच दहा रुपये या पद्धतीने मनमानी आकारणी सुरू असून तसे वेगवेगळ्या पावत्यांचे पुरावेही सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांना दिले आहेत. महापालिकेच्या वाहनतळांवर तसेच रंगमंदिरांमधील वाहनतळांवर कोणतीही पारदर्शी पद्धत नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
वाहनतळ व वाहतुकीसंबंधीच्या विभागाची जबाबदारी अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला यांच्याकडे असून त्यांच्या कार्यालयापासून पन्नास मीटर अंतरावर हा प्रकार होत असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहनतळावरील गैरप्रकाराबाबत आम्ही दोनदा तक्रार केली होती. तरीही तेथील गैरप्रकार महापालिका थांबवू शकत नाही, मग संपूर्ण शहरात ही योजना लागू करण्याचा अट्टहास कशासाठी केला जात आहे, अशीही विचारणा करण्यात आली आहे.
योजनेला काँग्रेसचा विरोध
या योजनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठवण्याच्या बाजूने काँग्रेसने स्थायी समितीमध्ये मतदान केले असले, तरी सर्वसामान्य पुणेकरांची लूट करणारी आणि त्यांना त्रासदायक ठरणारी ही योजना सभेपुढे आल्यानंतर योजनेला काँग्रेस विरोध करेल, असे सोमवारी सांगण्यात आले. ही योजना म्हणजे गुंडांच्या टोळ्यांना लुटीचा अधिकार देण्याचा प्रकार ठरेल, त्यामुळे विरोध असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा