बिबवेवाडीत व्यापाऱ्याच्या सदनिकेतून कपाटातील ४५ तोळ्यांचे दागिने आणि रोकड असा १५ लाख १७ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

याबाबत प्रवीण कांडपिळे (वय ४८, रा. सोबा सवेरा अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांडपिळे यांचा मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात गाळा आहे. कांडपिळे यांनी श्वानाचे पिलू खरेदी केली होते. श्वानाचे पिलू आणण्यासाठी ते सोमवारी (२० जून) दुपारी सदनिका बंद करुन कोथरुडला गेले होते. चोरट्यांनी सदनिकेच्या गॅलरीची जाळी उचकटून सदनिकेत प्रवेश केला. शयनगृहाचे कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील एक लाख ४० हजारांची रोकड आणि ४५ तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला.

कांडपिळे सायंकाळी घरी परतले. तेव्हा शयनगृहातील कपाट तसेच गॅलरीची लोखंडी जाळी उचकटल्याचे लक्षात आले. त्यांनी कपाटाची पाहणी केली. तेव्हा कपाटातील रोकड आणि ४५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करत आहेत.